एका शस्त्रक्रियेमागे १६४० रुपये मंजूर
ठाणे : मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीला सुरुवात होणार असून प्रत्येक शास्त्रक्रियेमागे १६४० रुपये असे एकूण दीड कोटींचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण असून कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांची नसबंदी केली जाते. त्याचे कंत्राट महापालिकेने खासगी कंत्राटी कंपनीला दिले होते. महापालिका क्षेत्रात 2004 ते 2019 पर्यंत आठ कोटी रुपये खर्च करून 58,537 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. दुसरीकडे ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या महासभेपूर्वी प्रशासनाने या कामासाठी पुन्हा 1.55 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र नगरसेवकांनी नसबंदी शस्त्रक्रियेला आक्षेप घेत हा प्रस्ताव नामंजूर केला होता. दोन महिन्यांनंतर पुन्हा महासभेत हा मुद्दा उपस्थित झाला. संबंधित कंपनीचा करार संपल्याने गेल्या वर्षभरापासून कुत्र्यांवर होणारी नसबंदी शस्त्रक्रिया बंद असल्याचे प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले.
यानंतर याबाबत नवीन निविदा काढण्यासाठी तीन वर्षांपूर्वी आणलेल्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. या मोहिमेसाठी ठाणे पालिकेने दिलेल्या प्रस्तावानुसार एकूण एक कोटी 55 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून या पैशातून नऊ हजार कुत्र्यांच्या नसबंदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. खासगी कंपनीमार्फत नसबंदी मोहीम राबविण्यात येणार आहे. कुत्र्यांना शस्त्रक्रिया केंद्रात आणण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी खासगी कंपनीने ठाणे पालिकेला प्रति शस्त्रक्रिया १६४० रुपये दिले आहेत.
मागील जून महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे १ मार्चपासून कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू होणार असल्याचे पालिकेच्या पशु वैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे.