अमित शहांनंतर मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला
ठाणे : मी छातीठोकपणे सांगू शकतो, आमच्या दोन वर्षांच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा कोणी घेऊ शकले नाहीत. कारण आम्ही सर्व निर्णय नागरिकांच्या हिताचे घेतले. त्यामुळे अनेक वर्षे सरकारमध्ये राहिलेले आणि ज्यांनी काम केले नाही त्यांनी सरकारवर आरोप करताना स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत अमित शहा यांनी पवारांबद्दल काढलेल्या उद्गाराचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन केले.
ठाण्यातील आनंद आश्रमात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आणि स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज गुरुपौर्णिमा आहे. कालच गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धर्मवीर पार्ट -2 ट्रेलर लॉन्च झालेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कालपासूनच गुरुपौर्णिमा सुरू झालेली आहे. आनंद आश्रममध्ये दरवर्षीप्रमाणे आनंद दिघे याना वंदन करण्यासाठी हजारो शिवसैनिक येत असतात, ही परंपरा आजही कायम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर धर्मवीर पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन चित्रपट आले. मात्र त्यांचे कार्य एक-दोन चित्रपटांमध्ये मावणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. धर्मवीर पार्ट -2 लॉन्च केला..ही धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली आहे. आनंद दिघे यांनी दाखवलेला मार्ग आणि जो विचार दिला तोच विचार आम्ही पुढे घेऊन जाणारे कार्यकर्ते आहोत. त्यांनी दिलेला विचार आणि दिशा मार्गक्रमण करण्याचे काम आमचे सरकार करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आनंद दिघे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम करायचे. सरकार तशाच प्रकारे काम करत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह अनेक योजनेवर काम आम्ही दिघे साहेबांचा विचार घेऊन करत आहोत. आनंद दिघे सत्तेत नसताना देखील काम करायचे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, त्यांनी दाखवलेल्या वाटचालीवर काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.