ठामपा करणार १०० कोटींचा खर्च
ठाणे : महापालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व प्रभाग समितीच्या इमारतींवर आणि पादचारी पुलांवर रोषणाई करण्यात येणार असून सुशोभीकरणासाठी १०० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असताना अशाप्रकारची संकल्पना राबवण्यात आली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात केवळ दिवाळीमध्ये शहरात अशाप्रकारे विद्युत रोषणाई करण्यात येत होती. आता पालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये ठाणे महापालिका मुख्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व प्रभाग समितीच्या इमारती तसेच शहरातील सर्व पादचारी पुलांचा देखील समावेश करण्यात आला आहे. केवळ दिवाळीनिमित्त नव्हे तर संपूर्ण वर्षभर ही विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण सुशोभीकरण आराखड्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.
या सुशोभीकरण आराखड्यामध्ये ठाण्यातील आनंद नगर चेक नाका तसेच मुलुंड चेक नाका या ठाणे शहराच्या दोन्ही प्रवेशद्वारावर भव्य दीपस्तंभ उभारण्यात येणार आहे. २५ ते ३० मीटरचे उंच असणार आहेत. या दोन्ही प्रवेश द्वारावर उभारण्यात येणाऱ्या दिपस्तंभामुळे ठाणे शहरात प्रवेश करताना शहराचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे.
२८ चौकांचा होणार विकास
दोन भव्य दिपस्तंभ उभारण्याबरोबरच शहरातील मुख्य चौकांचा विकास देखील करण्यात येणार आहे. यामध्ये महत्वाच्या २८ चौकांचा विकास केला जाणार आहे. ठाणे पालिका क्षेत्राची काही चौकांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या सर्व चौकांची रंगरंगोटी करण्यासोबतच प्रत्येक चौकात नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे त्या ठेकेदारावरच पाच वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे एकदा सुशोभीकरण झाल्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा काही पडझड झाल्यास संबंधित ठेकेदारावर जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.