निलेश पाटील शिवसेनेत
ठाणे : दिवा येथील भाजपचे मंडल अध्यक्ष आदेश भगत यांच्या पाठोपाठ नव्याने नियुक्त झालेले दिवा मंडल अध्यक्ष निलेश पाटील यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. दिव्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी सेनेत गेल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीच्या महूर्तावर दिवा येथील भाजपाचे मंडल अध्यक्ष आदेश भगत यांनी शिवसेनेत शेकडो समर्थकासह प्रवेश घेतला होता. त्यानंतर तातडीने भाजपने निलेश पाटील यांची दिवा मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करून दिव्यात भाजप आक्रमक होणार अशी गर्जना केली, परंतु २० दिवस उलटत नाहीत तोच आज निलेश पाटील यांनी मुंबईत।कृषीमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश पाटील यांनी शिवबंधन बांधून घेतले. यावेळी दादा भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील आणि दीपक जाधव, नगरसेविका अंकिता पाटील दीपाली भगत, सुनीता मुंडे, दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख उमेश भगत, भालचंद्र भगत आणि गुरुनाथ पाटील यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते.
मागील काही महिन्यांपासून दिवा परिसरात निलेश पाटील आणि आदेश भगत यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात रान उठवले होते, परंतु खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नगरसेवक माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी या भाजपाच्या दोन्ही मोहऱ्यांना गळाला लावून दिव्यातील भाजपचा सुपडा साफ केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला येथे तगडा उमेदवार मिळवताना नाकी नऊ येतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दिव्यात अनेक समस्या आहेत, मागील कित्येक वर्षापासून येथील विकास खुंटला आहे. त्यामुळे दिव्याच्या विकासासाठीच शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया निलेश पाटील यांनी दिली.
दिव्यात शिवसेनेची पायाखालची वाळू सरकत आहे. त्यांचा त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नाही, त्यामुळेच ते भाजपचे पदाधिकारी आपल्या सोबत घेत आहेत. निलेश पाटील याने स्वत: ही जबाबदारी घेतली होती. पक्षाने देखील त्याला संधी दिली होती. आता त्याचे दुर्भाग्य, असेच म्हणावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.