दिवेकरांना मिळणार शासकीय रुग्णालय, शाळा, पोलीस स्टेशन…!

दिव्यात भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

जिल्हाधिकारी आणि आयुक्तांचे आश्वासन

ठाणे: दिवा शहरातील आरक्षित भूखंडावरील स्थानिक शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आणि ठामपा आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडांवर शासकीय रुग्णालयासह अनेक सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहरातील शिष्टमंडळाने काल जिल्हाधिकारी व ठामपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले. दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील सेक्टर -१० मौजे आगासन दिवा शहरातील येथील आयआरडब्ल्यूओ आरक्षण क्रमांक-१, क्षेत्र १३.८७ हेक्टर भूखंडावर दिवावासीयांसाठी सुविधांचे जाळे उभारण्यास शासनाकडून संमती मिळाली आहे. सदर आरक्षित भूखंडावर अद्यावत शासकीय रुग्णालय बांधण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली असून सदर जागेवर रुग्णालय उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे.

दिवावासीयांचे आरोग्य लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सहा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दिवा शहरात कार्यरत आहेत. या दवाखान्यात रुग्णांची तपासणी, चाचण्या आणि औषधे मोफत असल्यामुळे त्याला दिवावासीयांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु मोठ्या उपचारासाठी रुग्णांना दिवा शहराच्या बाहेर जावे लागत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने दिवा शहरासाठी शासकीय रुग्णालयाच्या कामाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहर प्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या प्रयत्नांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच रोख रक्कमेच्या स्वरूपात मोबदला देण्यात यावा असा ठराव महासभेत करण्यात आला आहे. त्यानुसार आरक्षित भूखंडावरील शेतकऱ्यांना मोबदला मिळावा व भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी यासाठी शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली दिव्यातील शिष्टमंडळाने काल जिल्हाधिकारी व ठामपा आयुक्तांची भेट घेतली. जिल्हाधिकारी आणि ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी लवकरच स्थानिक शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दिपक जाधव, नगरसेविका सुनीता मुंडे, दिपाली भगत, दर्शना म्हात्रे, उपशहर प्रमुख अँड.आदेश भगत, युवासेना युवती प्रमुख साक्षी मढवी, विभागप्रमुख चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, शशिकांत पाटील, भालचंद्र भगत, निलेश पाटील, उपविभाग प्रमुख समीर पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.