नवी मुंबई : येत्या ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्या निमित्ताने सार्वजनिक मंडळांनी एक आठवडा आधीच गणपतीचे आगमन सुरू केले आहे. घरगुती गणपतीचे आगमन देखील पाच तारखेला सुरु होणार आहे. मात्र घणसोली परिसरात बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न येत असून सदर खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरावे, अशी मागणी श्री भक्तांकडून होत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी नवी मुंबई शहराला पावसाने झोडपल्यानंतर शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे ग्रहण लागले होते. मात्र या खड्ड्यांची दखल घेत मनपा आयुक्तांनी हे खड्डे युद्ध पातळीवर भरण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे शहरात खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र काही भागात अजूनही खड्डे पडले असून ते भरले गेले नाहीत. असेच खड्डे सध्या घणसोली परिसरात दिसून येत आहेत. येथील मेघ मल्हार सिडको गृहनिर्माण संकुल व भैरव को.ऑप.सोसायटी येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाप्पाचे आगमन डेंजर झोनमधून करावे लागेल का? अशी चिंता सध्या श्री भक्तांना सतावत आहे. त्यामुळे बाप्पाचे आगमन व विसर्जनाचा प्रवास निर्विघ्न पार पडावा म्हणून येथील खड्डे तत्काळ भरावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मेघ मल्हार सोसायटी व भैरव सोसायटीसमोरील नवीन रस्ता बनवण्याचे कंत्राट निविदा प्रक्रियेत आहेत. मात्र या ठिकाणी पडलेले सर्व खड्डे तत्काळ भरण्याच्या सूचना संबंधित अभियंत्यांना दिले असून गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे भरले जातील, अशी माहिती कार्यकारी अभियंता यशवंत कापसे यांनी दिली.