जिम्नॅस्टिक सेंटर व निसर्ग उद्यानाच्या नामकरणावरून वाद

लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांची नावे कशाला? – स्थानिकांसह मनसेची टीका

ठाणे : पोखरण रोडवरील जिम्नॅस्टिक सेंटर व निसर्ग उद्यानाचे स्थानिकांच्या मागणीचा विचार न करता परस्पर नामकरण करणे, स्थानिक नगरसेवकांना चांगलेच अंगलट आले आहे. या नामकरणाला परिसरातील आदिवासी समाज बांधव व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून आक्षेप घेतला असून याप्रश्नी आज आंदोलनही करण्यात आले.

यावेळी जिम्नॅस्टिक सेंटरला बाबुराव सरनाईक यांच्याऐवजी पदमश्री आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिकपट्टू दीपा कर्माकर यांचे तसेच निसर्ग उद्यानाला या भागातील आदिवासी बांधवांचे दैवत व निसर्गपूजक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याप्रश्नी मनसेच्या वतीने पालिका आयुक्तांना पत्रही देण्यात आले असून जनमताचा आदर करून प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

पोखरण रोड क्रमांक दोन येथील जिम्नॅस्टिक सेंटरचे काम पूर्ण होऊनही त्याचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट बाबुराव सरनाईक यांच्या नावाचा फलक लावणार आहेत. येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोर्टयार्ड गृहसंकुलशेजारील निसर्ग उद्यानाला इंदिरा सरनाईक यांचे नाव लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र हे दोन्ही प्रकल्प विकासकाने बांधून महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. यातील जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये येणाऱ्या सर्व जिम्नॅस्टिकपट्टुना प्रेरणादायी वाटेल, अशा पद्मश्री आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिकपट्टू दीपा कर्माकर यांचे नाव देणे अधिक उचित ठरेल. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासी बांधवांच्या मागणीचा विचार करता निसर्ग उद्यानाला इंदिरा सरनाईक या नावाऐवजी निसर्गपूजक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागअध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले.

याच मागणीच्या अनुषंगाने आज मनसे, स्थानिक आदिवासी समाज बांधव व सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे जिम्नॅस्टिक सेंटरबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या वास्तूचे जनमताचा आदर करत नामकरण केले जावे, असेही आंदोलकांनी सांगितले. यावेळी मनसे विभागअध्यक्ष संदीप पाचंगे, अमोल राणे, प्रमोद पत्ताडे, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा, जितेंद्र भोये, हेमंत महाले, स्थानिक रहिवासी गिरीष हेगिष्टे, गणेश कायस्थ, श्रीकांत अधटराव, समाधान साळवी, संदेश बाबार्डेकर, अर्जुन नाईक, गवस, कारंडे, दत्ता कुंडले, आशिष दुधवडकर, मंगेश चव्हाण, प्रजापती, निलेश महाले, शुभम गायकवाड आदी उपस्थित होते.