कल्याण : भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांचे सर्व गैरसमज दूर केले. यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे एकदिलाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
भिवंडी लोकसभेत मागील काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमजांमुळे दुरावा होता. मात्र या दुराव्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी दोन्ही पक्षांकडून डॅमेज कंट्रोल करण्याची भूमिका घेण्यात आली होती. याच अनुषंगाने आज डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भिवंडी लोकसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मागील काही दिवसात झालेले गैरसमज दूर करण्यात आले. यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
भविष्यात दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये काहीही गैरसमज झाल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. तसेच ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी समज-गैरसमज बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.