कट्टर विरोधकांच्या एकत्र हसत-खेळत विकासावर चर्चा!

ठाणे : एकमेकांना पाण्यात पाहणारे कळवा-मुंब्रा भागातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते कळवा मुंब्रा येथील विकास कामांबाबत एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला हे काल महापालिकेत कळवा-मुंब्रा भागातील विकासासाठी आयोजित केलेल्या बैठकीकरिता एकत्रित आले होते. कळवा येथील मिनी नाट्यगृह, कळवा भागातील तरण तलावाचे नव्याने सुशोभीकरण आणि पारसिक रेतीबंदर वॉटर फ्रंट विकास लवकर करण्याची सूचना यावेळी करण्यात आली होती. उपस्थित सर्वपक्षीय नेते कळवा-मुंब्रा भागातील विकासासाठी एकमताने विविध सूचना करून काम लवकर करण्यासाठी भर देत होते, त्यामुळे काही महिन्यापूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हेच नेते होते का असा सवाल यावेळी उपस्थित करत होते.

लोकसभा निवडणुकीत आ.आव्हाड यांनी शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात रान उठवले होते. त्यामुळे मुंब्रा-कळवा मतदार संघात सेनेचे उमेदवार डॉ. शिंदे यांना मताधिक्य मिळू शकले नाही तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेऊन आ. आव्हाड यांच्या विरोधात तोफ डागली होती. अनेक सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आव्हाड यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना मतदारसंघात थोपवून ठेवले होते. निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरु होता. आ. आव्हाड यांचे कार्यकर्ते देखिल फोडण्यात आले होते. या सर्व नेत्यांचा वाद आणखी वाढण्याची शक्यता असताना हे सर्व नेते एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत खा ल.नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि आमचे पक्ष वेगळे असले तरी कळवा-मुंब्रा या भागाच्या विकास कामासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आता कोणतीही निवडणूक नाही. महापालिका निवडणूक होईल तेव्हा काय ते पाहू. परंतु विकासकाम करताना सर्वाना सोबत घेऊन काम करणे आवश्यक असल्याचे खा.श्री. म्हस्के म्हणाले.