ठाण्यात चर्चा तिघांची, मात्र गुढी उभारणार चौथा !

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धक्कातंत्र

आनंद कांबळे/ठाणे

ठाणे लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असून शर्यतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या सर्व इच्छुक उमेदवारांची विकेट उडणार असून तगडा उमेदवार हे मैदान जिकण्यासाठी रंगणात उतरणार असल्याची चर्चा महायुतीमध्ये सुरु झाली आहे.

शिवसेनेने आणि भाजपाने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे, त्यामुळे या मतदार संघाबाबत महायुतीमध्ये एकमत होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे होम ग्राउंड असल्याने ते या मतदार संघावरील दावा सोडण्यास तयार नाहीत तर या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार बाजी मारेल असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मतदार संघ मिळवण्यासाठी आग्रही आहेत.

शिवसेनेचे नरेश म्हस्के, रविंद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे तर भाजपाकडून संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे, संजय केळकर आणि संदिप लेले यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेने या मतदार संघावरील दावा कायम ठेवल्याने चिन्हाची अदलाबदल करून भाजपाचा उमेदवार रिंगणात उतरविण्याचा पर्याय भाजपाने सेनेसमोर ठेवला होता, परंतु तो मान्य करण्यात आला नाही. सेनेच्या इच्छुक उमेदवारांची जिंकून येण्याची क्षमता नाही असा सूर भाजपातून लावला गेल्याने या मतदार संघाचा तिढा कायम राहिला आहे. या मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यासाठी महायुतीमध्ये अडचण येत असल्याने अखेर या मतदारसंघात सध्या इच्छुक असलेल्या महायुतीमधील सर्व इच्छुकांना बाद करून उबाठाचे राजन विचारे यांच्या विरोधात शिवसेनेचा तगडा उमेदवार उतरवण्याच्या हालचाली शिंदे गटात सुरु झाल्या आहेत. हा उमेदवार पाडव्यानंतर जाहीर होणार असल्याचे शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले. तोपर्यंत उमेदवाराविना महायुतीचा प्रचार सुरु ठेवा असे आदेश देखिल देण्यात आले आहेत.