शिस्तीत रांगेत राहायचे, भाडे नाही नाकारायचे!

* स्टेशन परिसरात रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे
* आरटीओ, वाहतूक आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम

ठाणे: ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरल्याने प्रवाशांना सुखद अनुभव येत असून बेशिस्त रिक्षा चालकांना मात्र चाप बसला आहे. प्रवासी सांगेल तिथे भाडे घेऊन जाणे रिक्षाचालकांना बंधनकारक असेल. भाडे नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिला आहे.

आ. निरंजन डावखरे यांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस अधिकारी आणि रिक्षाचालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचे पालन रिक्षा चालकांनी करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात रिक्षाचा वापर करत असतात. याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षाचालक अडलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमानी भाडे आकारतात, जवळचे भाडे नाकारतात, मीटरप्रमाणे भाडे न घेता जास्त भाडे वसूल करतात, नियमापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात, वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या रांगेत उभे न राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकामधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात. या सर्व प्रकारास आता चाप लावण्यात आला आहे.

वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस संयुक्तपणे या ठिकाणी कायदा मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर नजर ठेऊन कठोर कारवाई करणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच ठाणे स्टेशन पश्चिम येथील सॅटिस पुलाखाली असलेल्या रिक्षा स्टॅन्ड, स्टेशन परिसराच्या ठिकाणी प्रादेशिक परिवहन, वाहतूक विभाग आणि पोलिसांनी पाहणी करून रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा पाहिला होता. याबाबत आमदार निरंजन डावखरे यांच्याकडेही प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या सर्वांचे फलित म्हणून आता स्टेशन परिसरात रिक्षा चालकांना कमालीची शिस्त लागणार आहे. शिस्त मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. कायदा मोडल्यास एकाच वेळी तिघांच्या कारवाईचा अशा रिक्षा चालकांना सामना करावा लागणार आहे. यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे रेल्वे स्टेशन येथे पार पडलेल्या बैठकीत आमदार निरंजन डावखरे, , ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, प्रादेशिक परिवहन विभाग सहायक अधिकारी प्रसाद नलावडे, सहायक पोलिस आयुक्त रोहित काटकर, वायू वेग पथक क्र. ७ आणि सर्व ऑटो रिक्षा युनियनचे पदाधिकारी, रिक्षा चालक मालक, प्रवासी यांची बैठक पार पडली.

रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँडवर करण्यात आलेले नियम बदल

रिक्षा युनियन पदाधिकारी, चालक आणि मालक यांनी रिक्षा लेन समोर उभे राहून प्रवासी बसवायचे नाहीत. रिक्षाच्या चार लेन चालू राहतील. महिलांकरिता विशेष रिक्षा लेन असेल. मीरा-भाईंदरकरिता विशेष लेन असणार नाही. प्रवासी एका रांगेत येऊन रिक्षात बसतील आणि ठिकाण सांगतील. चालकाने भाडे नाकारल्यास, रिक्षा बाजूला उभी करून प्रवासी आणण्याकरिता गेल्यास, युनिफॉर्म, बॅच, वाहनाची वैध कागदपत्रे नसल्यास ई-चलान दिले जाईल. प्रवाशांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

रेल्वे प्रवाशांकरिता सॅटिस पुलाखाली रिक्षा स्टॅन्ड असून येथील रांगेत रिक्षा चालकांना प्रवासी सांगेल तेथे भाडे घेऊन जावे लागणार आहे. इतरत्र कुठेही रिक्षा उभी करण्यास सक्त मनाई आहे. कायदा मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलीस, वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ.राठोड यांनी दिला आहे. प्रवाशांची काही तक्रार असल्यास त्यांना mh04rikshawcomplaint@gmail.com या ईमेलवर तक्रार करता येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.