आव्हाड-शिंदे गटात दिलजमाई; कळवा-मुंब्र्याबाबत सेनेची नरमाई

* विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाशी असहकार्य
* महायुतीत पहिला मिठाचा खडा

ठाणे: आगामी विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा मतदारसंघात अजित पवार गटाला ही जागा मिळाल्यास शिवसेना शिंदे गट असहकार्याची भूमिका घेणार असल्याने शरद पवार गटाला दिलासा मिळणार आहे.

कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. जितेंद्र आव्हाड हे करत असून या मतदारसंघात त्यांना रोखून ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. मागील महिन्यात ठाण्याचे विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांची आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची गळाभेट झाली होती तर लोकसभा निवडणुकीपूर्वी आ. आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखिल दिलजमाई झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपुत्र खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातील तलवार आ. आव्हाड यांनी म्यान करून ठेवली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गट देखिल या मतदारसंघात जास्त जोर लावणार नसल्याचे बोलले जात आहे.

या मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांना रिंगणात उतरवले जाण्याची दाट शक्यता आहे. श्री. मुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीत युतीधर्म पळाला नाही, असा उघड आरोप खा. श्री. म्हस्के हे करत आहेत. त्यांनी कल्याण आणि ठाणे या दोन मतदारसंघात युतीचे उमेदवार निवडून येतील यासाठी एकही सभा किंवा पदयात्रा काढली नाही. समाजाच्या भीतीने त्यांनी युतीच्या उमेदवाराकडे पाठ फिरवली होती, मग आम्ही देखिल समाजाच्या उमेदवारालाच मदत करणार अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. नजीब मुल्ला यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणताही उमेदवार दिला तर मात्र आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे देखिल तो पदाधिकारी म्हणाला

आव्हाड यांच्याबरोबर गळाभेट झाल्याबाबत खा. श्री. म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमची गळाभेट झाली. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, त्यामुळे आम्ही भेटलो होतो. मुंब्रा-कळवा मतदार संघाबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही ही जागा शिवसेनेकरिता मागणार आहोत. आमचा तेथे राजन किणी हा सशक्त उमेदवार आहे, त्यांना आम्ही निवडून आणणार, असे श्री. म्हस्के म्हणाले.