ठाण्यात कोंडीचा वार

* पातलीपाडा मार्गावर कंटेनर पलटी, कॅडबरीजवळ अपघात
* चाकरमानी, शाळा बस तीन तास वाहतूक कोंडीत

ठाणे: एकीकडे जोरदार पावसाने वाहतुकीचा वेग मंदावला असताना ठाण्यात आज पातलीपाडा आणि कॅडबरीजवळ अनुक्रमे कंटेनर पलटी आणि सिमेंट मिक्सर वाहनाचा अपघात झाला. या दोन्ही घटना ऐन धावपळीच्या वेळी सकाळी आणि दुपारी घडल्या. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दोन-अडीच तास वाहतूक कोंडी झाली. यात चाकरमान्यांसह शाळेच्या बसही अडकून पडल्या.

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा येथे कंटेनर पलटी झाल्याने या मार्गावर सुमारे तीन ते चार किलोमीटर लांब गाड्यांच्या रांगा लागल्या, त्यामुळे अनेक चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. घोडबंदर मार्गांवर वाहतूक कोंडी ही नेहमीची झाली असून आज सकाळी ७. ३० च्या दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पातलीपाडा येथे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून तो दुभाजकावर चढला. हा कंटेनर हटवण्यासाठी दोन क्रेन आणण्यात आल्या होत्या. हा कंटेनर हटवताना तो पलटी झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या सुमारे १० ते १५ बस या कोंडीत अडकून पडल्या होत्या.

घटना घडल्यानंतर सुमारे अडीच ते तीन तासांनी हा कंटेनर हटवण्यात आल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत सुरु झाली होती त्यानंतर दुपारी १२च्या दरम्यान कॅडबरी नाका येथे सिमेंट मिक्सरच्या गाडीचा अपघात झाल्याने या मार्गावर देखिल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला. सकाळी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना लेट मार्क मिळाला तर अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागली होती.