ठाणे : सलग बारा दिवसांच्या अतिदक्ष उपचारानंतर दोन नवजात बालकांना ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील सेठ लक्ष्मीचंद फतेहचंद प्रसूतिगृहातील स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट (एसएनसीयू) मधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे.
अत्यंत कमी वजन असलेल्या या नवजात बालकांमध्ये गंभीर स्वरूपाच्या वैद्यकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या बालकांना तातडीने एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण देखरेखीखाली आवश्यक उपचार करण्यात आले. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर झाली. आपल्या बाळांना सुरक्षितपणे घरी घेऊन जाता आल्याने पालकांनी वैद्यकीय पथकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या उपचार प्रक्रियेत महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनसीयूच्या व्यवस्थापक डॉ. समिधा गोरे, निओनेटोलॉजिस्ट डॉ. ओंकार नेरुळकर, डॉ. विशाल, डॉ. दिगंबर, डॉ. सूरज तसेच परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. प्रत्येक टप्प्यावर दक्षता घेतल्यामुळे उपचार यशस्वी ठरल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
पालिकेच्या एसएनसीयू विभागात व्हेंटिलेटरसह अत्याधुनिक नवजात अतिदक्ष सुविधा, आधुनिक उपचार प्रणाली आणि चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असल्याने गंभीर अवस्थेतील बालकांवर तातडीने उपचार करता येतात. त्यामुळे अनेक नवजात बालकांना जीवनदान मिळत असून, सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये या विभागाने विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. नवजात बालकांच्या उपचारातील या यशामुळे ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली असून, एसएनसीयूतील डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.