प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आणि गाणी ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर छत्रपती शिवरायांच्या कोणत्या मोहिमेवर चित्रपटाची निर्मिती करणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतंच याचे उत्तर समोर आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडी या शिवराज अष्टकाच्या माध्यमातून समोर येत आहे. याद्वारे आठ विविध चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड हे तीन चित्रपट यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ येत्या शुक्रवारी (२२ एप्रिल) प्रदर्शित होत आहे.
दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता दोन दिवसांनी शेर शिवराज हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी, पोस्टर यासोबतच ट्रेलर चांगलेच चर्चेत आहे. शेर शिवराजनंतर शिवराज अष्टकातील कोणता अध्याय प्रेक्षकांसमोर येणार याची अनेक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अखेर त्याचे उत्तर समोर आले आहे.
शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमेवर असणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. छत्रपती शिवरायांच्या आग्रा मोहिमेवरील हा चित्रपट येत्या २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यासाठीची मोहीम, त्यांची आग्रा भेट, या भेटीदरम्यान झालेल्या घडामोडी आणि महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका या सर्व थरारक घडामोडी या चित्रपटातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. दरम्यान दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यानंतर आता शेर शिवराज हा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.