डिजिटल आधारित कल्पक सेवा, व्यवसाय वृद्धीकेंद्रित विलीनीकरणे

* टीजेएसबीची अन्य राज्यात विस्तार योजना
* टीजेएसबी सहकारी बँकेचा ५४वा वर्धापन दिन

ठाणे: टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने आपला ५४ वा वर्धापन दिन डिजिटल आधारित कल्पक सेवा, व्यवसाय वृद्धीकेंद्रित सहकारी बँकांची विलीनीकरणे आणि अन्य राज्यात विस्तार योजना यासह संपन्न करत आहे. “Expanding Horizons-आपल्या क्षितिजांचा विस्तार” ही या वर्षाची बँकेची संकल्पना यातून स्पष्ट्पणे व्यक्त होत आहे.

५४व्या वर्धापन दिनानिमित्ताने बँकेने ग्राहकांची सुविधा, सुरक्षितता आणि गतीमान सेवा देणाऱ्या डिजिटल उपक्रमांची घोषणा केली. यामध्ये सुरक्षित व नियंत्रित व्यवहारांसाठी प्रीपेड कार्ड्स, विशेष सुविधा देणारे SELECT प्रीमियम डेबिट कार्ड, कर्ज प्रक्रियेला अधिक सुलभ व जलद करणारी डिजिटल लोन ओरिजिनेशन सिस्टीम, TJSB SMART प्लॅटफॉर्मवर UPI एकत्रीकरण, UPI मर्चंट अक्वायरिंग सेवांचा विस्तार तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (ULI) वर ऑनबोर्डिंग यांचा समावेश आहे. ULI ही प्रणाली कर्ज क्षेत्रासाठी UPI ला समकक्ष मानली जाते.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने सहकारी बँकिंग क्षेत्रातील विलीनीकरणाद्वारे झालेल्या वाढीवरही भर देण्यात आला आहे. २०२५ मध्ये सिटिझन को-ऑपरेटिव्ह बँक लि., गोवा आणि सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांचे यशस्वी विलीनीकरण पूर्ण झाले असून, त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्ग येथे बँकेची स्थिती अधिक भक्कम झाली आहे. याच धोरणाच्या पुढील टप्प्यात भवानी सहकारी बँक लि. च्या विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. यातून मुंबई परिसरात बँकेचे कामकाज अधिक गतिमान होईल. या विलीनीकरणामुळे नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाधिष्ठित बँकिंग सेवा देणारी मजबूत बँक असे टीजेएसबी सहकारी बँकेचे स्थान अधोरेखित झाले आहे.

बँकेच्या विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, टीजेएसबी सहकारी बँकेने राजस्थान आणि छत्तीसगड या दोन नव्या राज्यांमध्ये पदार्पणाची घोषणा केली. जयपूर आणि रायपूर येथे लवकरच बँकेच्या नवीन शाखा सुरू होणार आहेत. यामुळे बँके आपल्या पारंपरिक व्यावसायिक क्षेत्रांपलीकडे विस्तारून राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवेल.

टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले, “टीजेएसबीची वाढ ही नेहमीच ग्राहकांचा विश्वास, कार्यक्षम प्रशासन आणि सहकारी मूल्यांवर आधारित राहिली आहे. बँकेने यापूर्वी केलेली विलीनीकरणे, आणि आता भवानी सहकारी बँक लि. चे विलिनीकरण तसेच, नव्या राज्यांतील नियोजित विस्तार हे दीर्घकालीन स्थिरता आणि सातत्यपूर्ण वाढीसाठी उचलेले ठोस पाऊल आहे. क्षितिजाचा विस्तार करत असताना, सहकारी बँकिंग क्षेत्राशी आमची बांधिलकी आमची बांधिलकी अढळ आहे.

टीजेएसबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर म्हणाले, “आमचा ५४ वा वर्धापन दिन हा आतापर्यंतच्या आमच्या वाटचालीचा आढावा घेण्याचा आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे. डिजिटल कल्पक सेवा, भौगोलिक विस्तार आणि धोरणात्मक विलीनीकरण हे आमच्या व्यवसायाच्या धोरणाचे केंद्रबिंदू आहेत. यामुळे आम्ही सुरक्षित, कार्यक्षम आणि सुलभ ग्राहक सेवा देऊन गेल्या पाच दशकांपासून जोपासलेला विश्वास अधिक वाढवू ”

पाच दशकांहून अधिक ग्राहक सेवेदरम्यान टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड डिजिटल तंत्रज्ञान गुंतवणूक, ग्राहक संरक्षण आणि कार्यनिपुणता यावर भर देत असून, देशभर आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड ही एक अग्रगण्य बहुराज्जीय सहकारी बँक आहे. बँकेचे कामकाज पाच राज्यात आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि डिजिटल बँकिंग उपाय योजनांच्या तत्पर अंलबजावणीसाठी ओळखली जाणारी ही बँक रिटेल तसेच व्यावसायिक बँकिंग सेवा पुरवते. तंत्रज्ञान, सुशासन आणि सर्वसमावेशक वाढ यांवर लक्ष केंद्रित करत, टीजेएसबी सुरक्षित आणि सुलभ व्यवसायिक पर्याय उपलब्ध करून देत आहे.