मुंबई-पुणे मार्गावरील अपघाताचा दूध व्यवसायाला फटका
ठाणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातामुळे झालेल्या ३० तास वाहतूक कोंडीत दुध पुरवठा करणारी अनेक वाहने अडकून पडली. परिणामी ठाण्यात गुरूवारी फक्त ५० टक्के दुध पुरवठा झाला. त्यामुळे शहरात दुधाचा तुटवडा निर्माण होऊन नागरिकांचे हाल झाले.
सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतून ठाणे-नवी मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दूध पुरवठा केला जातो. बुधवारी द्रुतगती मार्गावरील अपघातामुळे या सर्व वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. अनेक गाड्या कोंडीत अडकून पडल्या. तर काहीजण शहरात येण्याऐवजी तेथूनच माघारी परतले. काही मोजक्याच गाड्या पर्यायी मार्गाने शहरात पोहोचू शकल्या. त्यामुळे शहरात पुरेसा दुध पुरवठा होऊ शकलेला नाही.
ठाणे शहरात दररोज सरासरी साडेपाच ते सहा लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो. मात्र अपघातानंतर झालेल्या वाहतूक कोंडीत दुध वाहने अडकल्याने शहरात निम्माच दुध पुरवठा गुरुवारी सकाळी झाला. परिणामी शहरातील किरकोळ विक्रेते, दूध विक्री केंद्रे तसेच हॉटेल व्यवसायिक यांच्यासमोर मोठी अडचण उभी राहिली. सकाळच्या वेळेत अनेक भागांत दूध उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. काही ठिकाणी मर्यादित प्रमाणातच दूध विक्री करण्यात आली. या संपूर्ण परिस्थितीमुळे शहरात तात्पुरता दुधाचा तुटवडा निर्माण झाला असून पुढील काही दिवस पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.