पोषणआहार मिळाला की नाही? ट्रॅकर ॲप्लीकेशन देणार माहिती

जिल्ह्यातील दीड लाख बालके

गरोदर-स्तनदा मातांचे आधार कार्ड काढणार

ठाणे : पोषण आहार प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळाला की नाही याची नोंद घेण्यासाठी ‘पोषण ट्रॅकर ॲप्लीकेशन’द्वारे शासनस्तरावर नियमित घेण्यात येणार आहे. त्यामुळे या ॲप्लीकेशनवर नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य असल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील दीड लाख बालके, गरोदर व स्तनदा मातांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.

जिल्ह्यात नऊ एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत १८९४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके ,गरोदर व स्तनदा माता असे मिळून जवळपास दीड लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी २७ आधारकार्ड संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इंडियन पोस्ट विभागाने गावातील प्रत्येक पोस्टमनला आधार नोंदणीकरीता व्ही.एल.ई म्हणून कामकाज दिलेले आहे. त्यामुळे पोस्टमनकडे उपलब्ध असलेल्या आधार नोंदणी मशीनव्दारे पोस्टमन आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण करणार आहे. इंडियन पोस्ट यांच्या कार्यालयामार्फत यासाठी एकूण १८७ आधारकार्ड संच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जवळपास २१३ आधार संचाव्दारे आधार नोंदणीचे कामकाज जिल्हात सुरू आहे. ही आधार नोंदणी अंगणवाडी केंद्रावर सुरु असून १५ जुलैपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची आधार नोंदणी करण्याचे नियोजन महिला व बाल विकास विभागाने केले आहे.