डायबिटीस (मधुमेह) म्हणजे उतार वयात होणारा आजार हा आतापर्यंतचा असलेला समज. परंतु खरंच हा समज योग्य आहे का ?
कमी वयात डायबिटीस होण्याची प्रमुख कारणे :
बदलती बैठी जीवनशैली आणि वाढता लठ्ठपणा हे कमी वयात डायबिटीस होण्याचे प्रमुख कारण आहे. वाढत्या आर्थिक सुबत्तेमुळे उपहारगृहात खाण्याकडे तसेच जंक फूड खाण्याकडे वाढलेला कल यामुळे भारतात लठ्ठपणाचे प्रमाण 28% अधिक आढळून येते आणि सुमारे 39% रुग्णांचा पोटाचा घेर प्रमाणापेक्षा जास्त आहे.
आईला असलेला गरोदरपणातील डायबिटीस, वाढता ताणतणाव, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अपुरी झोप, उच्च रक्तदाब, प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ, आहारातील प्रथिने आणि फायबरचे कमी प्रमाण तसेच कर्बोदकांचे आणि चरबीयुक्त पदार्थांचे जास्त प्रमाण याचबरोबर वाढते वायू प्रदूषण ही तरुण वयात डायबिटीस होण्याची प्रमुख कारणे आहेत.
निदान :
जास्त प्रमाणात भूक लागणे, तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, वारंवार लघवीस होणे, जखमा भरण्यास विलंब होणे या लक्षणांमुळे केल्या गेलेल्या रक्त चाचण्यांद्वारे प्रामुख्याने डायबिटीसचे निदान होते. परंतु अधिकांश व्यक्तींमध्ये इतर काही कारणांसाठी केलेल्या चाचण्या दरम्यान डायबेटिसचे निदान होते.
कमी वयात डायबिटीस होण्याचे दुष्परिणाम :
डायबिटीसचा कालावधी जितका जास्त तितकेच दुष्परिणामांचे प्रमाणही अधिक. कमी वयात डायबिटीस झालेल्या व्यक्तींना डायबिटीसचे दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. जर जास्त काळ एखाद्या व्यक्तीची रक्तातील साखर अनियंत्रित असेल तर अशा व्यक्तीत हृदयविकार मूत्रविकार किंवा डोळ्यांच्या विकारांची शक्यता सर्वाधिक असते. कमी वयात डायबिटीस झालेले स्त्रियांना गर्भधारणेत तसेच गरोदरपणात अडचणी जाणवू शकतात.
कमी वयात डायबेटीस झालेल्या व्यक्तींनी घ्यावयाची काळजी :
कमी वयात डायबिटीस झालेल्या व्यक्ती योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि तणावमुक्तीच्या माध्यमातून डायबिटीस रिव्हर्स करू शकतात. प्रारंभिक दोन ते तीन वर्षात डायबिटीस रिव्हर्स करणे शक्य आहे. त्यासाठी आपण आपल्या मधुमेह तज्ञांची सल्लामसलत करू शकता.
पुरुषांमध्ये पोटाचा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा कमी तसेच स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा कमी राखणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर ध्यानधारणा, योगा तसेच आपल्या छंदांचे जोपासन, पुरेशी झोप या मार्गांनी तणाव नियंत्रणात ठेवणे जरुरीचे आहे.
आहारतज्ञांच्या मदतीने आपण सकस आणि चौरस आहाराचे सेवन करू शकता आणि त्यातून मिळणाऱ्या कॅलरीचे प्रमाण नियंत्रणात राखू शकता.
नियमित व्यायाम हा दीर्घकालीन डायबिटीस नियंत्रणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
डायबेटिसच्या रुग्णांनी कुठल्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे अतिशय गरजेचे आहे.
अशा प्रकारे काळजी घेऊन कमी वयात डायबिटीस झालेले रुग्ण देखील अतिशय उत्तम आरोग्य राखू शकतात.
– डॉ. सागर कजबजे
मधुमेह डायबिटीस स्पेशालिटी क्लीनिक
पारसमणी अपार्टमेंट, पहिला मजला ,एम. जी. रोड, नौपाडा, ठाणे- पश्चिम
9220333010