टवाळ तरुणांची दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
कल्याण: शिवाजी कॉलनी परिसरात काल रात्रीच्या सुमारास चार महागड्या दुचाक्या जाळण्यात आल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असले तरी स्थानिक नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याच परिसरात काही दिवसापूर्वीच काही तरुण हातात काठ्या घेऊन लोकांच्या गाड्या फोडताना सीसीटीव्हीत दिसून आले होते.
दरम्यान १० दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात काही तरुण हातात तलवारी घेऊन रस्त्यावर फिरतानाचे सीसीटीव्ही व्हायरल झाले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे या परिसरात पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित झाला असून नागरिक देखील दहशतीच्या छायेत आहेत.
काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेतील कोलशेवाडी शिवाजी नगर परिसरात अज्ञाताकडून चार दुचाक्या पेटवून दिल्याची घटना घडली .या घटनेत दुचाक्याचे मोठे नुकसान झाले आहे .कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात कारणावरुन या गाडय़ा जाळण्यात आल्या आहेत असे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. स्थानिक नागरीकांनी काही तरुण दहशत माजविण्यासाठी गाडय़ा जाळत आहेत. २० दिवसापूर्वी तरुणांचे हे कृत्य एका सीसीटीव्हीत कैद झाले होते. या सीसीटीव्हीमध्ये तरुणांच्या हातात काठय़ा आहेत नागरीकांच्या गाडय़ासह अन्य वस्तूचे नुकसान करण्यासाठी ते चाळीत फिरत होते. तेच तरुण पुन्हा दुसऱ्या रस्त्याने आले. त्यांनी गाडय़ा जाळल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी कोळशेवाडी पोलीसानी तपास सुरू केला. त्यामुळे या घटनेमुळे स्थानिकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. २० सप्टेंबर रोजी अशाच एका टवाळ तरुणांच्या टोळीकडून हातात तलवारी घेऊन रात्रीच्या सुमारास कल्याण पूर्व संतोष नगर परिसरात धुडगूस घातल्याची घटना घडली होती. दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.