धर्मवीर आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे नाही- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

ठाणे: धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही. ते ५० वर्षांत शंभर वर्षांचे आयुष्य जगले. प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्यासारखे काम करायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा मुंबई येथे अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेते प्रसाद ओक लुकमध्ये मंचावर अवतरले आणि त्यांना बघून उपस्थित असलेले सर्वच जण अवाक् झाले. यावेळी प्रसाद ओक म्हणाले की, “एक कलाकार म्हणून आयुष्यात मनाजोगी भूमिका साकारायला मिळणे, हे फार कमी कलाकारांच्या नशिबात असते. आजवर मी प्रसाद ओक म्हणून अभिनय केला. ‘धर्मवीर’मध्ये मी अशी व्यक्तिरेखा साकारली आहे, जी काही वर्षांपूर्वी हयात होती. हे एक राजकारणातील महान व्यक्तिमत्व होते. ज्यांचे सामाजिक स्थानही तितकेच भक्कम होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांवरून मी या व्यक्तिरेखेला हुबेहुब साकारल्याचा आनंद आहे. मात्र ती साकारण्यासाठी मला साहेबांच्या कुटुंबियांची, निकटवर्तीयांची बरीच मदत झाली. जेव्हा मी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो तेव्हा मला अनेकदा असे वाटायचे, तो मी नव्हेच. आरशात पाहताना मला आनंद दिघेंचाच भास व्हायचा. याचे सारे श्रेय ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांना जाते.”

एकनाथ शिंदे म्हणाले, ” ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे. आनंद दिघे यांचे विचार जसे भव्यदिव्य होते तसाच भव्यदिव्य हा चित्रपटही आहे. ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटाचे मोठे मोठे होर्डिंग्ज लागतात. तसेच होर्डिंग्ज आता मराठी चित्रपटाचेही लागत आहेत. नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपली चांगली जागा निर्माण करेल.”

अभिनेते-निर्माते मंगेश देसाई आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,” कोणत्याही चित्रपटात नेहमी काळ वेळ व प्रारब्ध हे अतिशय महत्वाचा घटक मानला जातो. मी जेव्हा निर्मिती क्षेत्राकडे वळलो तेव्हा मला वाटले नव्हते की एवढा चांगल्या व दर्जेदार चित्रपटाची मी निर्मिती करेन. आज हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आला आहे तो आनंद दिघे साहेब यांच्यामुळे.”

तर हे शिवधनुष्य पेलणं किती अवघड होतं हे सांगतांना लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले की, ” मी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट आणण्याचा प्रयत्न करत असतो व प्रेक्षकवर्गाला नवीन काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो. एका राजकीय नेत्याचा जीवनपट बनवणे काही सोपे काम नव्हते. पण माझ्या सोबत मंगेश देसाई व झी स्टुडिओ असल्याने या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या जुळवता आल्या.’’

‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या १३ मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.