मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर चित्रपट हा काही लोकांना खटकला, काही लोक सिनेमा बघता बघताच मध्येच उठून गेले तर चित्रपटातील काही प्रसंगही या लोकांना आवडले नसल्याचा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
धर्मवीर पार्ट 2 चित्रपटाचा मुहूर्त झाला. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता प्रसाद ओक, निर्माता मंगेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. सुरुवातीला हे सरकार पडणार अशी भविष्यवाणी केली, त्यानंतर आता मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा करू लागले, भविष्य सांगणारेही आता थकले, मात्र माझ्यामागे बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचे आशीर्वाद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे अशी घोषणा काही लोक करत होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी मंदिर बांधूनही दाखवले अणि उदघाटनाची तारीखही सांगितली. त्यामुळे सर्वांनी अयोध्येला जाण्याचे आवाहन त्यानी यावेळी केले.
धर्मवीर चित्रपटाबद्दल बोलताना हा धर्मवीर चित्रपट काही लोकांना खटकला, पहिला भाग पाहताना काही जण मध्येच निघून गेले. त्या चित्रपटातील काही सिन,काही डायलॉग काहीना आवडले नाही.
मात्र आता आपल्याकडे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे कुणाचे ऐकण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
स्व.आनंद दिघे यांचे संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या टीमचे अभिनंदनही त्यांनी यावेळी केले.
चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मवीर स्व.आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्याचेच आम्हीही अनुकरण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवीण तरडे यांनाही काही सिन आवडले नव्हते
धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शक स्वतः प्रवीण तरडे यांनाही चित्रपटातील काही प्रसंग आवडले नसल्याचा खुलासाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. कलाकार हे मूडी असल्याने त्यांची समजूत प्रेमाने काढावी लागते, तरडे यांची समजूतही प्रेमाने काढली असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मवीर पार्ट 2 हिंदीतही येणार
धर्मवीर हा सिनेमा हिंदीत डब केला गेला मात्र हिंदीतून तो जास्त लोकांपर्यंत पोहचला नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र धर्मवीर पार्ट 2 हा हिंदीतही आणावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.