जितो ठाण्यात उभारणार धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

ठाणे: जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टने आता ठाण्यात महत्त्वाकांक्षी धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा येत्या रविवारी, ३० जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. श्री. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ‘जितो’चे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विकासक अजय आशर यांनी दिली आहे.

देशात वेगाने वाढत असलेला कर्करोग, त्याच्या उपचारासाठी होणारा खर्च, उपचारांची मर्यादित उपलब्धता, रुग्णांची गैरसोय, मानसिक आणि आर्थिक समस्या, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवास व्यवस्थेतील अडचणी यांची स्थिती लक्षात आल्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठाणे शहरात अद्ययावत असे कर्करोग रुग्णालय उभारण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस होता. ते शिवधनुष्य जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टने उचलण्याचा निश्चय केला आहे.
त्यानुसार, जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टतर्फे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ३० वर्षांच्या कराराने जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टला जमीन उपलब्ध करून दिली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालय प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी तांत्रिक सहकार्य करीत आहे. रुग्णालयाच्या बांधकामासोबत, उपचार साधनांचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा खर्च जीतो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट करणार आहे.

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयात ५०० हून अधिक रुग्ण खाटा, बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी), आंतर रुग्ण सेवा, रेडिएशन, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, एक्स रे, सिटी स्कॅन, एमआरआय, डे केअर सुविधा, पॅथॉलॉजी आदी सुविधा असतील. तसेच, उपचाराच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली ६०० खाटांची धर्मशाळा उभारली जाणार आहे. ती अल्पदरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध राहील. तसेच, मुंबईतील टाटा मेमोरिअल रुग्णालयामध्ये ज्या प्रमाणे रुग्ण सुविधा दिल्या जातात, त्याचप्रमाणे ठाणे कर्करोग रुग्णालयामध्ये रुग्णांना किफायतशीर दरात रुग्णसेवा दिली जाणार आहे.
ठाण्यात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल आणि त्रिमंदिर संकुल यांचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते रविवार, ३० जुलै रोजी दुपारी ४ वाजता ग्लोबल हॉस्पिटल, बाळकूम येथे होणार आहे. या सोहळ्यास दादा भगवान फाऊंडेशनचे दिपक देसाई शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. तर, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास शंभूराज देसाई, मंत्री, राज्य उत्पादन शुल्क आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, रवींद्र चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) हे विशेष उपस्थित राहणार आहेत.