अंबरनाथला महाशिवरात्रीला शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी

अंबरनाथ: येथील प्राचीन शिवमंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. कडक उन्हाची तमा न बाळगता भक्तांचा अक्षरशः महापूर आला होता.

प्रयागराज येथील महाकुंभ झाल्यानंतर महाशिवरात्री आल्याने मोठ्या प्रमाणत गर्दी होणार असा अंदाज पोलीस यंत्रणेने व्यक्त केला होता. तो अंदाज आजच्या गर्दीने खरा ठरला.

दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात मोठी यात्रा देखील भरते. ठाणे, रायगडसह आसपासच्या जिल्ह्यातील राज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हिंदू धार्मिक संस्कृतीत महाशिवरात्री हा सण देवांचे दैवत भगवान शिव यांना समर्पित असून मोठ्या भक्ती आणि श्रद्धेने साजरा केला जातो.

शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्री १२ वाजता स्थानिक परंपरागत पुजारी यांनी शिवलिंगाला अभिषेक केला. त्यानंतर भाविकांना मध्यरात्रीपासून प्राचीन शिवमंदिर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश न देता गाभाऱ्याबाहेरून भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भाविकांना शिवलिंगाचे दर्शन घेता आले. तसेच यात्रेकरूंसाठी मोठ्या प्रमाणात आकाश पाळणे, लहान मुलांसाठी करमणूक साधने तसेच इतर सुविधा यात्रेत उपलब्ध होत्या.

दरवर्षी उल्हासनगरच्या दिशेने कैलास कॉलनी चौकमार्गे शिवमंदिरात जाण्यासाठी भाविकांची रांग असे, मात्र यंदा या मार्गात बदल करण्यात आला. प्राचीन शिवमंदिर कमानीमार्गे निर्माणाधीन वालधूनी नदीच्या घाटावर भाविकांची रांग लागली होती. पुढे नदी ओलांडून तात्पुरत्या रॅम्पमार्गे मंदिरात जाण्याचा मार्ग ठेवण्यात आला होता. कमानीमार्गे अंबरनाथच्या दिशेने बाहेर जाण्याचा मार्ग होता.