देवमाणूस २ मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे, म्हणूनच पहिल्या पर्वानंतर लगेचच या मालिकेचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस वाहिनीने आणलं. या पर्वाला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. पाहता पाहता देवमाणूस २ या मालिकेने १०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. दुसऱ्या पर्वाच यश आणि १०० भागांचा यशस्वी प्रवास, देवमाणूसच्या टीमने हा आनंद सेटवर केक कापून साजरा केला. या यशामागे संपूर्ण टीमची मेहनत असल्यामुळे या आनंदाच्या क्षणी एकमेकांचं कौतुक केलं आणि आभार देखील मानले.
पहिल्या पर्वात अजितकुमारला लग्नाच्या मांडवातून दिव्या सिंगने खेचून पोलीस स्टेशनला नेलं त्यामुळे डिम्पल आणि अजितच लग्न काही होऊ शकलं नाही. पण आता या पर्वात पुन्हा या दोघांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. नुकतंच प्रेक्षकांनी या मालिकेत पाहिलं कि सोनूला कळते अजित डिंपल सोबत लग्न करणार आहे. मधू सोनुसाठी स्थळ बघत आहे,सोनू चिडलेली आहे. सोनू अजितच्या प्रेमात पडली आहे हे अजितला कळतं. एकीकडे लग्नाची तारीख काढली जातेय तर दुसरीकडे गुंड येऊन अजितला धमकी देऊन जातात. सोनूचं अजितवरचं प्रेम तिला शांत बसू देत नाही आहे, ती अजितला दोघांनी पळून जाऊया असं म्हणून त्याच्याकडे पैसे घेऊन येते. अजित डिम्पलसोबत लग्न करणार कि सोनूसोबत पळून जाणार? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.