आठ हजार स्पर्धकांनी घेतला सहभाग
बदलापूर: बदलापुरात शिवसेनेच्या माध्यमातून शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी आयोजित वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल आठ हजार स्पर्धकांनी भाग घेतला. यातून देविदास कडाळी यांनी खुल्या गटात तर महिलांच्या गटात किशोरी मोकाशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
मंगळवारी 15 ऑगस्टला बदलापूरच्या कात्रप, बेलवली, आणि गांधी चौकात विविध दहा गटांतील स्पर्धेला सुरुवात झाली. दुपारी गांधी चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आणि आयोजक वामन म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.
खुल्या गटातील दहा किमी स्पर्धेत देविदास कडाळी तर महिलांच्या गटात किशोरी मोकाशी विजेती ठरली. याखेरीज गटनिहाय स्पर्धेत धनुष जाधव, सार्थक यादव, शमिका भला, प्रेरणा यादव, इशा चव्हाण आदींनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. बाळाराम कांबरी, उल्हास आंबवणे, नरेंद्र शेलार, युवा नेतृत्व वरून म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते, मात्र कोरोनामुळे दोन वर्षे स्पर्धा होऊ शकली नव्हती, त्यानंतर काल झालेल्या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.