* अजित पवार गटाचा आरोप
* विविध विकास कामांसाठी ५० कोटींचा निधी आणणार
ठाणे: गेल्या दहा वर्षांत कळवा-मुंब्रा मतदारसंघात विकास कामांसाठी आलेला निधी नागरिकांपेक्षा कंत्राटदारांनाच फलदायी ठरला, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या मतदारसंघासाठी ५० कोटींचा निधी आणणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर खास करून शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदार संघात घेरण्याची मनसुबे अजित पवार गटाकडून आखण्यात येत आहे. त्याची सुरुवात मंगळवारी जाहीर पत्रकार घेऊन झाली. या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक आणि अजित पवार यांच्या जवळचे नजीब मुल्ला यांनी या मतदारसंघात झालेल्या गैरकारभाराची पोलखोल करण्याचे जाहीर केले आहे. मागील १० वर्षातील कथित विकासकामांचा दर आठवड्यातून एकदा पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.
२००९ साली राष्ट्रवादीचा झेंडा कळवा मुंब्र्यात आम्ही फडकवून इथला उमेदवार निवडणून आणला असल्याचे आव्हाड यांचे नाव न घेता नजीब मुल्ला यांनी सांगितले. तर यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा स्थानिक पातळीवर करण्यात आली असल्याने कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
या मतदारसंघासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी देण्यात येणार असून मुंब्रा-कळवा क्षेत्रासाठी अल्पसंख्यांक विभागाकडूनही विशेष निधी दिला जाणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत कौसाच्या पुढील लोकवस्तीसाठी, वाय जंक्शनच्या पुढील लोकवस्तीसाठी वनखात्याच्या जागेवर केंद्र सरकारने मंजूर केलेले आणखीन एक कब्रस्थान बनविण्यात येईल, कामांच्या निविदा निघाल्यावर येत्या पावसाळ्यातच नागरी विकास कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती नजीब मुल्ला यांनी दिली.
५० कोटी देऊन जनतेला विकत घेता येणार नाही-जितेंद्र आव्हाड
मुंब्य्रासाठी 50 कोटीचा निधी दिला; त्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानतो. पण, 50 कोटी रूपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल; अशी अपेक्षा ठेवू नका. बारामतीला एक हजार कोटींचा निधी दिला होता, मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमच्याशी गद्दारी करून बाहेर पडल्यानंतर मी अजित पवार यांच्यावर तोफ डागली होती. त्यामुळे ते मला निधी देताना हात आखडता घेतील, यात वादच नव्हता. या आधीही तीन वर्षे ते असेच वागत होते. आता माझ्याविरुद्ध ज्याला उभा करायचा आहे. त्याच्या नावे हा निधी दिलेला आहे. एवढंच नाही तर आमच्या नगरसेवकांना पाच कोटीची ऑफरही दिली होती; पण, एकही नगरसेवक त्यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे आता पन्नास कोटी दिले आहेत. तसे पाहता ते हजार कोटीही आणतील. पण, ज्यांनी हा निधी आणलाय त्यांनी आपल्या वाॅर्डातही बघावे. आपल्या वाॅर्डातील स्लाॅटर हाऊसच्या रस्त्याची काय अवस्था आहे, हे त्यांनी पहावे. सर्वात गमतीचा भाग म्हणजे, आमदाराला निधी न देता जो माणूस आता नगरसेवकही नाही: त्याला निधी दिला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडत आहे. याची जनता नोंद घेणारच आहे, असा टोला आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांना यावेळी लगावला.