अंबरनाथ: अंबरनाथमध्ये ऊर्जा निर्मिती करणाऱ्या झाडांचे वाटप करून ऑक्सी होम, ऑक्सी झोन आणि ऑक्सी स्ट्रीट निर्माण करण्याच्या उद्देशाने निखिल चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे, अशा प्रकारच्या सुमारे ५०० झाडांचे वाटप आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते नागरिकांना करण्यात आले.
कोरोना कालावधीत ऑक्सिजनची कमतरता जाणवली होती. नागरिकांच्या घरातच नासा संस्थेने मान्यता दिलेली ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे लावू शकतो का अश्या विचारातून संकल्पना सुचली. वातावरण स्वच्छ आणि शुद्ध करणारी, लहान घरात देखील ऑक्सिजनची झाडे लावण्याचे आवाहन आयोजक आणि रॉयल रोटरी क्लबचे अध्यक्ष निखिल चौधरी यांनी केले. येत्या काही दिवसांत घर, परिसर आणि प्रभागात ऊर्जा निर्मितीची झाडे लावण्यात येणार असल्याचे निखिल चौधरी यांनी यावेळी सांगितले. इच्छुकांना झाडे मोफत देण्यात येणार आहेत.
ऑक्सिजन निर्मितीची झाडे घरात आणि परिसरात लावण्याची गरज निर्माण झाली असून निखिल चौधरी यांच्या उपक्रमाचे आमदार डॉ. किणीकर यांनी कौतुक केले. सर्जेराव सावंत, मारुती दोरुगडे, शिवकुमार मुदलियार आदी यावेळी उपस्थित होते.