जलयुक्त शिवार योजना राबवूनही गावं, वाड्या, वस्त्यांना पाण्याची झळ कायम

दोन वर्षात पाणी टंचाईग्रस्त गावांची तहान कायम

ठाणे : ‘थेंबे थेंबे पाणी साचे’ या युक्तीप्रमाणे शासनाने जलयुक्त शिवार योजना राबवून पाण्याची टंचाई कमी करण्याचा प्रयत्न  केला असला तरी तो फारसा यशस्वी ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मार्च महिना सुरू झाला की पाण्याच्या टंचाईची झळ गावातील वाड्या – वस्त्यांमध्ये दिसून येते. गेल्या दोन वर्षात वाड्या वस्त्यांची पाणीटंचाई काही अंशी कमी झाली असली तरी गावांमध्ये ती वाढलेलीच दिसून येते. ठाण्यातील २८४ गावं आणि ५३२ वाड्या वस्त्यांची तहान भागत नसल्याचे समोर आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई ही शहापूरमधील १२४ गावं आणि ३१५ वाड्या वस्त्यांमध्ये तसेच मुरबाडमधील ७६ गावं आणि ९१ वाड्या-वस्त्या तर भिवंडीमधील २९ गावे आणि ६६ वाड्यावस्त्यांमध्ये  सर्वाधिक आहे. तर त्याखालोखाल कल्याण, अंबरनाथ यांचा ही समावेश असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून समोर आली आहे. शासन दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करूनही गावातील पाण्याची तहान कायम आहे. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मात्र गावांची संख्या त्यात वाड्या वस्त्यांची संख्या त्याहून अधिक असूनही केवळ ३२ टँकरच्या माध्यमातून ९५ गावांना पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. आजही ग्रामीण भागात महिला हंडे घेऊन कैक किलोमीटर पायपीट करत पाण्यासाठी वणवण फिरत असल्याचे चित्र अद्यापही बदलेले नाही हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

पिण्याची पाणी टंचाई असलेली गावं वाडे
२०१९-२०                       २०२०-२१
एकूण टंचाईग्रस्त गावे                           १९५                               २८४
एकूण वाड्या वस्त्या                             ५७२                                ५३२
टँकरने पुरवठा होणारी गावे                   २४७                                  ९५
टँकरची संख्या                                   –                                        ३२