बंदी असतानाही अनधिकृत सदनिकांची नोंदणी जोरात

दिपेश म्हात्रे यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अनधिकृत इमारतींचा विषय गाजत असताना देखील या अनधिकृत इमारतींचे रजिस्ट्रेशन होत असल्याचा धक्कादायक खुलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केला.

यासंदर्भात दिपेश म्हात्रे यांनी पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. यावेळी कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, शहर प्रमुख सचिन बासरे, अभिजीत सावंत, प्रकाश तेलगोटे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असून, यामुळे शासनाचा व नागरिकांचा मोठा आर्थिक तसेच कायदेशीर फसवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या खोट्या सही व शिक्क्यांचा वापर करून बनावट परवानग्या तयार करण्यात आल्याचे उघड झाले होते. यामुळे शासनाची दिशाभूल झाल्याने शासनामार्फत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या नोंदणीवर बंदी घातली होती. परंतु, ही बंदी असतानाही काही भ्रष्ट अधिकारी मोठ्या प्रमाणावर लाच स्वीकारून अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांची नोंदणी करत असल्याचा आरोप दिपेश म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकारामुळे शासनाची दिशाभूल होऊन नागरिकांची फसवणूक होत आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची व कायदेशीर कारवाई करावी. तसेच, सर्व अनधिकृत नोंदण्या त्वरित रद्द करून भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होणार नाही, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.