नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने पाम बीच मार्गावर सायकल ट्रॅक बांधण्यात आले आहेत, या कामात अनेक बाबी अपूर्ण असताना ठेकेदाराचे अंतिम बिल सादर केल्याने नेरूळ विभागातील उप अभियंता किशोर अमरनानी व कनिष्ठ अभियंता विनोद जैन यांचे मनपा आयुक्तांनी निलंबन केले आहे.
पाम बीच मार्गालगत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सायकल ट्रॅक बांधण्यात येत आहेत. या कामाला सुरुवात होताच या ठिकाणी विनापरवाना वृक्षतोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत तत्कालीन शहर अभियंता संजय देसाई यांनी आरोपकर्त्यांविरोधात पालिकेची बदनामी केली म्हणून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सुरुवातीपासून हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना हे काम आता दोन अभियंत्यांवर चांगलेच शेकले आहे.
हे काम अपूर्ण असताना या दोन अभियंत्यांनी ठेकेदाराचे अंतिम देयक सादर केले. मात्र वास्तूविशारद यांनी या कामात अनेक त्रुटी असल्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर केल्यानंतर दोन्ही अभियंत्यांना कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने अखेर या दोन्ही अभियंत्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे स्थापत्य विभागातील अभियंत्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.