ठाणे – भिवंडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार असलेल्या एका लाचखोर अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना मुंबई अँटी करप्शन पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. विट्ठल रामभाऊ गोसावी असे अटक केलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे.
८ लाखांची केली होती मागणी –
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. त्यासाठी रेल्वेलगतच्या शेतजमिनी शासनाला हस्तांतर करून त्याबद्दल मोबदला देण्यात येत आहे. अशाच एका शेतकऱ्याची रेल्वेच्या तिसऱ्या लोहमार्गात बाधित होणाऱ्या जमिनीसाठी एका खासगी व्यक्तीकडून तक्रारदार यांना लाचखोर गोसावीने बाधित जमिनीचा मोबदला देण्यासाठी ८ लाखांची मागणी केली होती. मात्र, त्यामध्ये तडजोड होऊन लाचेची रक्कम ६ लाख देणे ठरले होते. या दरम्यान तक्रारदार यांनी मुंबई अँटी करप्शन विभागात नायब तहसीलदार गोसावी व एका खासगी व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दाखल केली होती.
भिवंडी प्रांत कार्यालयात सापळा-
तक्रारीच्या अनुषंगाने भिवंडी प्रांत कार्यालयात सापळा रचला असता नायब तहसीलदार गोसावीला ६ लाखांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तर गोसावी राहत असलेल्या निवासस्थानीही एक पथक दाखल होऊन त्यांच्या घराची झाडाझडती घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रांत कार्यालयाच्या आवारात लाचखोर गोसावी याच्या कारची तपासणी करून त्यामधील काही कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेत आहेत.