बाल लैंगिक प्रकरण उघडकीस आणणाऱ्या चेंदवणकर यांचे डिपॉझिट जप्त

ठाणे : मनसेने विधानसभा निवडणुकीत १२८ उमेदवारांना रिंगणात उतरवले होते, मात्र यापैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. यात बदलापूर येथील बाल लैंगिक प्रकरण उघडकीस आणणाऱ्या संगिता चेंदवणकर यांचाही समावेश असून त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

यंदाच्या निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यातच, मनसेच्या जवळपास 100 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच, राज ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर ट्वटि करत अविश्वसनीय आणि तूर्तास एवढेच, असं ट्विट केलं होतं.

मनसेनं यंदाच्या निवडणुकीत 128 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून उमेदवार दिले होते. उमेदवारी देताना चाळण लावून चांगल्या उमेदवारांना मैदानात उतरवलं होतं. विशेष म्हणजे राज्यात चर्चेत राहिलेल्या बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडणाऱ्या, आणि बदलापूर शाळेतील हे प्रकरण लावून धरलेल्या मनसेच्या रणरागिणी संगिता चेंदवणकर यांनाही राज ठाकरे यांनी उमदेवारी दिली होती. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना राज ठाकरे यांनी मैदानात उतरवले तसेच बदलापूरमधील बाल लैंगिक प्रकरणाच्या अत्याचाराला सर्वप्रथम समोर आणणारी रणरागिणी म्हणत राज यांनी जाहीर सभेतून त्यांचे कौतूकही केले होते. मात्र, येथील मतदारांनी त्यांनाही नाकारले आहे. संगिता चेंदवणकर यांना केवळ 7,894 मतं मिळाली.