गावठाण-कोळीवाड्यांचे सीमांकन; अंतर्गत मेट्रोचा प्रकल्पाचा पुनर्विचार

आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या समस्यांना फोडली वाचा

ठाणे : सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली. ठाण्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरला.

ठाणे शहरात गावठाणे आणि कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी जाहीर केले होते. प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकले नाही. हे सीमांकन होणे गरजेचे आहे. सीमांकन झाल्याशिवाय या विभागांचा विकास होणार नाही. त्यामुळे शासनाने सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

ठाण्यात प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प क्लस्टरमुक्त करण्यासंबंधी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र एसआरए प्रकल्पांबाबत ठोस धोरण तयार करण्याची गरज आहे. हे प्रकल्प अनेक कारणांनी मध्येच बंद पडतात, विस्थापित रहिवाशांना विकासकाकडून भाडे मिळत नाही, विक्री करण्याचा भाग आधी सुरू होतो, त्यामुळे रहिवासी घरे रखडतात. जो प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण व्हायचा त्याला दहा-दहा वर्षे लागतात. त्यामुळे एसआरए प्रकल्पाला कालमर्यादा दिली पाहिजे तसेच एसआरए अधिकाऱ्यांनी झोपडी धारकांच्या बाजूने काम करायला हवे, विकासकांच्या बाजूने काम करू नये, अशी रचना करण्याची गरज असल्याचे मत श्री. केळकर यांनी व्यक्त केले. तसेच एमएमआरडीए क्षेत्रात अनेक शहरांतील विकासकामांसाठी एक लाख ७५ हजार कोटींचा निधी देणारे महायुतीचे सरकार या क्षेत्राचे भाग्यविधाते आहेत याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदनही श्री.केळकर यांनी केले.

शहरात अंतर्गत मेट्रो प्रकरणी पुनर्विचार करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे निर्देश दिले होते पण अद्याप ती झाली नाही. या नियोजित प्रकल्पामुळे इमारतींचा विकास थांबला आहे. काही अटी शर्थीवर काही इमारतींना पुनर्विकास करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी या प्रकल्पामुळे सुमारे ७०-७५ इमारती भरडल्या जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी श्री. केळकर यांनी केली.

ठाण्यात नवीन तीन तरण तलाव प्रस्तावित आहेत. मात्र आधी जे तरण तलाव तयार आहेत त्याचे फक्त लोकार्पण होते आणि ते पडून राहतात. २०२२ साली ऑलिम्पिक दर्जाचा तलाव तयार असून ते आधी सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत. गेली तीन वर्षे बंद असलेले कला भवनही सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. कोट्यवधी रुपये खर्चून वास्तू उभारल्या जातात, पण योग्य देखभालीअभावी त्या पडून राहतात, याबाबतही श्री. केळकर यांनी खंत व्यक्त केली.

घोडबंदर परिसरात अनेक नाले आहेत. दर पावसाळ्यात नाले समस्या उद्भवते.या नाल्यांची बांधणी करून ते खाडीपर्यंत सोडण्यासाठी ५० ते ६० कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी मंजूर करण्यात यावा, पोलीस वसाहतींच्या विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, मुद्रांक शुल्क भरण्याची अभय योजना जूनपर्यंत वाढवावी आणि शहरातील अकृषिक करास स्थगिती असली तरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशा मागण्या आमदार संजय केळकर यांनी केल्या. तसेच शहरातील शासकीय आणि पालिकेच्या जमिनीवर अतिक्रमणे झाली असून राज्य शासनाच्या आदेशानंतरही स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या जमिनी अतिक्रमणमुक्त करून त्या ताब्यात घेण्याची सूचनाही श्री. केळकर यांनी केली.