महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शक सूचना
ठाणे : ‘मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी महानगरांत आणि शहरांमध्ये रेडीमिक्स प्लांटमुळे हवेत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. या समस्येबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सावध झाले असून हे प्लांट उभारण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत ‘मुंबई महानगर प्रादेशिक’ परिसरातील क्षेत्रासाठी ‘स्टोन क्रशर हॉट मिक्स प्रकल्प’ आणि ‘आरएमसी प्रकल्प’ धारक यांची बैठक नुकतीच बोलवण्यात आली होती. बैठकीत हवेची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक असलेली अधिसूचना लागू करण्यात आली आहे,असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध क्षेत्रातील बांधकाम क्षेत्र तसेच पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने सुरू असलेली विविध विकासकामे स्टोन ‘क्रशर रेडी मिक्स’ कारखाने यांना मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. त्यामध्ये सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रात कार्यरत असलेले कारखाने यांना मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अधिसूचनेतील मार्गदर्शक निकष
नवीन रेडीमेड प्लँट महानगरपालिका आणि नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्तरावर स्थापित केलेल्या समितीच्या परवानगीनंतरच प्रकल्प स्थापित करता येणार आहे.
नियोजित असलेल्या कमीतकमी 20 हजार वर्ग मीटर बांधकाम प्रकल्प क्षेत्रांमधील जागेत ‘कॅप्टिव रेडीमिक्स काँक्रीट’प्रकल्पांसाठी 2000 वर्ग मीटर राखीव जागेची तरतूद करणे आवश्यक आहे आणि नवीन व्यावसायिकांना प्रकल्पांना 1000 वस्ती असलेल्या क्षेत्रांपासून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा प्रमुख रस्ते यांच्यापासूनचे अंतर 500 मीटर असणे अत्यावश्यक आहे. तसेच शाळा आणि कॉलेजेस्, रुग्णालये आणि न्यायालय यापासूनचे अंतर 500 मीटर असणे आवश्यक आहे.
‘कॅप्टिव्ह रेडी मिक्स काँक्रीट’अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांना पुढील तीन महिन्यांच्या काळात पूर्णत: बॉक्साइल अच्छादन करून घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी दहा लाख रुपयांची बँक हमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करणे अत्यंत आवश्यक आहे.
नियोजित असलेल्या कमीतकमी 20 हजार मीटर बांधकाम प्रकल्प क्षेत्रांमधील जागेत ‘कॅप्टिव्ह रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्प प्रकल्पकांसाठीही 2000 वर्ग मीटर राखीव जागेची तरतूद करणे आवश्यक आहे. अशा मार्गदर्शक सूचना प्रदूषण मंडळाने दिल्या आहेत आणि त्या न पाळल्यास कारवाईचे संकेतही दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.