ठाणे-पालघर जिल्ह्यातून १३१२३ क्विंटल बियाणांची मागणी

भात पीकासाठी कृषी विभागाचे नियोजन

ठाणे: लोकाभिमुख शासन म्हणून कोकण विभागात अनेक कृषी विषयक योजना सुरु आहेत. कोकणात सर्वसाधारणपणे 4.15 लाख हेक्टर खरीप क्षेत्र आहेत. यात सर्वाधिक 1.06 लाख हेक्टर क्षेत्र रायगडमध्ये खरीपासाठी उपयोगात आणले जाते.

कोकण कृषी विद्यापीठ आणि शासनाचा कृषी विभागाने एकत्रीत विचार करुन भात लागवडीबाबत विविध उपाययोजना केल्या जातात. त्यातून मोठ्या प्रमाणावर भात उत्पादनात वाढ होत आहे. अलिकडच्या काळात घरचे भात बियाणे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. सुधारित जातीचे बियाणे तीन वर्षासाठी वापरले जाते. त्यामुळे भात पीकातील भेसळ कमी होते. विशेषत: कोकणात वाडा कोलम, मुरबाड, झिली, लाल पटनी या स्थानिक भाताच्या वाणाला अधिक मागणी असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर बिजोत्पादन कार्यक्रम वाढविले आहेत.

सन 2023-24 या वर्षातील खरीप हंगामासाठी ठाणे जिल्ह्यातून 1372 क्विंटल, पालघरमध्ये 11751 क्विंटल, रायगडमध्ये 4585 क्विंटल, रत्नागिरीमध्ये 1965 क्विंटल, सिंधुदुर्ग मधून 1846 क्विंटल बीयाणांची मागणी आहे. 21519 क्विंटल एकूण भाताचा बीयाणांची मागणी महाबीज विद्यापीठ आणि खाजगी क्षेत्रातून पूर्ण करण्यात येईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कोकण विभागात भाताच्या बियाणांची कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी कृषी विभागाने घेतली आहे. शासनाच्या कृषी आराखड्यानुसार यंदा हेक्टरी उत्पादन वाढीसाठी विविध नविन तंत्रज्ञानाचा वापर होवून उत्पादनात वाढ होईल.

शासन केवळ बीयाणांची उपलब्धता करुन थांबले नाही तर त्यासाठी लागणारे खते देखील वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहचतील याची काळजी घेणार आहे. भातासाठी लागणारा आणि अन्य पिकांसाठी लागणाऱ्या खतांच्या पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोकण विभागात यंदा 98200 मेट्रीक टन खताची मागणी आहे. यात युरिया, ङिए.पी., एम.ओ.पी., एस.एस.पी, एन पी. के आणि इतर खतांचा पुरेसासाठी जिल्हानिहाय उपलब्ध करण्यात आला आहे. खतांच्या आणि बियाणांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी शासनाने कोकण विभागात 50 भरारी पथक स्थापन केले. 50 निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष, 44 तालुकास्तरीय तक्रार निवारण व कक्ष आणि संनियंत्रणासाठी विभाग आणि जिल्हा स्तरीय समित्यांच्या माध्यमातून यावर लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी कोकण विभागात 60 अर्धावेळ जि.प.निरीक्षक 79 अर्धवेळ राज्य निरीक्षक, 7 पूर्णवेळ निरीक्षक, असे एकूण 146 निरीक्षक यासाठी नेमण्यात आली आहेत.

उपलब्ध कीटक नाशके आणि परवानाधारक विक्री केंद्रांमध्ये हा साठा उपलब्ध आहे. जैविक खतांच्या अधिकाधिक वापर करण्याचा दृष्टीने कृषी विभाग शेतकऱ्यांशी संपर्क साधून प्रात्याक्षिक दाखवित आहे. “शासन आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत शेती विषयक योजना लोकांपर्यंत पोहचवत आहेत. यात पिक प्रात्यक्षिके, शेती शाळा, बीज प्रक्रिया, ग्रामबीजेत्पादन यासह प्रचार प्रसार होतो आहे. भात लागवडीच्या विविध पद्धतीत श्री पद्धत, एसआरटी पद्धत यंत्राद्वारे भात लागवड, चारसूत्री पद्धत, ड्रम सीडर, मॅन्युअल सीडरद्वारे भात लागवड या विस्ताराच्या योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

एकूणच खरीप हंगामासाठी आणि कोकणातील भाताचे उत्पादन सर्वाधिक यावे यासाठी शासनाने सूत्रबद्ध नियोजन केले आहे. शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभ मिळविण्यासाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.