स्विगीच्या गोदामातून आजारांची डिलिव्हरी?

मनसेकडून पाहणी आणि इशारा

ठाणे: भिवंडीस्थित स्विगीच्या गोदामात जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थांचा साठा असताना तेथे उंदीर, झुरळ यांचा सुळसुळाट असल्याचे आढळून आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या गोदामास भेट देऊन प्रशासनाला इशारा दिला तर याची दखल घेण्याची सूचनाही अन्न औषध प्रशासनाला केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी ग्रामीण भागातील सावद नाका जानवल येथे स्विगीचे मोठे गोदाम असून येथे ग्राहकांना इतर गोदामांच्या माध्यमातून साहित्य, अन्न पदार्थ पोचते केले जातात. दरम्यान या मुख्य गोदामात अस्वच्छतेचे साम्राज्य असून उंदीर, झुरळांचा सुळसुळाट असतो.अन्न पदार्थांची पाकिटे फुटून इतस्ततः पसरलेले असतात. मागील दोन दिवस एक उंदीर या गोदामात मरून पडला होता, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्विगी प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या गोदामास कार्यकर्त्यांसह धडक दिली. लोकांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा साठा ज्या ठिकाणी केला जातो, ते ठिकाण एवढे अस्वच्छ आहे की नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती श्री.जाधव यांनी दिली.

यावेळी त्यांनी गोदामातील कंपनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची चांगलीच कान उघडणी केली तसेच गोदाम सील करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळवले असता कोणीच वेळेवर दखल घेतली नसल्याची खंतही श्री. जाधव यांनी व्यक्त केली.