गृह कर्जाचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा दिल्लीच्या ठकांना तुुरुंगाची हवा

ठाणे : दिल्लीच्या तीन ठकांनी कल्याण येथील गृह कर्जासाठी इच्छुक ग्राहकाला २७ लाखांच्या कर्जाचे आमिष दाखवून तब्बल सात लाखांना गंडवल्याची घटना मानपाडा हद्दीत घडली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अनिल कारभारी असे फसगत झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. गृहकर्ज घेण्यासाठी ते विविध बँकांमध्ये प्रयत्न करीत होते. त्यांना 22 सप्टेंबर 22 रोजी आर.के. शर्मा व्यक्तीचा फोन आला. त्याने तो बजाज फायनान्समधून बोलत असून तुमच्या नावावर १० लाखांचे कर्ज मंजुर झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर कारभारी यांना कर्ज मंजूर झाल्याचे फोन व मेसेज वारंवार येऊ लागले . कर्ज हवे असल्यास शशांक प्रसादच्या नावे कोटक महिंद्रा दिल्ली या खात्यावर प्रथम ३० हजार रुपये प्रोसेसिंग फी भरण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे कारभारींनी 30000 रुपये प्रसाद यांच्या बँक खात्यावर पाठविले. त्यानंतर या तीन ठकांनी फिर्यादीला २७ लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून आणखी रक्कम भरण्यास सांगितले. पैसे भरले नाहीत यापूर्वी भरलेले पैसे मिळणार नाहीत, अशी धमकी देऊन त्यांच्याकडून एकूण सात लाख 34 हजार 500 रुपये विविध बँक खात्यात भरणा करण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्यांना एक लाख रुपये आणखी  भरण्यास सांगितले.

कारभारी यांना तीनही इसमांचा संशय येऊन आपण फसवले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहितीच्या आधारे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. ज्या बँक खात्यांत पैसे भरणा केला, ती खाती सील करण्यात आली. बँक खात्यावर असलेल्या पत्त्यांवरून शोध पथकाने तपास सुरू केला असता नमन संजय गुप्ता याला सिमला येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर इतर आरोपींचा शोध घेत त्यांच्याकडून सात लाख 34500 रुपये तसेच पाच मोबाईल फोन, एटीएम कार्ड असा एकूण नऊ लाख 21 हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

ही कारवाई कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परिमंडळचे उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे, निरीक्षक (प्रशासन) सुरेश मदने, सहाय्यक निरीक्षक अविनाश वनवे आणि सुनील तारमळे, हवालदार सुशांत तांबे, सुनील पवार, पोलीस नाईक भिमराव शेळके प्रवीण किनरे, पोलीस शिपाई बालाजी गरुड, संतोष वायकर यांच्या पथकाने केली.