रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांच्या स्मारकाचे महाडमध्ये लोकार्पण

सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीर्णोद्धार ही अभिमानाची बाब-आ. संजय केळकर

ठाणे: स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांच्या महाड तालुक्यातील कींजळोली खुर्द येथील स्मारकाचा जीर्णोद्धार सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला, याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी शिवभक्तांना संबोधताना केले.

 

 

 

 

 

 

 

सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी पुढाकार घेऊन स्मारकाचा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीर्णोद्धार केला. स्मारकाचे लोकार्पण रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्मारकासमोर स्वराज्याची पताका म्हणून 111 फुटींचा उंच भगवा ध्वज उभारला आहे. आदर्शवत असे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यास अभिनेते चिन्मय मांडलेकर, दिगपाल लांजेकर, इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे, रायगड स्मारक समितीचे कार्यवाह सुधीर थोरात, सरपंच अश्विन किंजळे, स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व चार हजार शिवभक्त उपस्थित होते.

दुर्गसंवर्धन चळवळीतील कार्यात सह्याद्री प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान आहे. आजच्या तरुण पिढीने दुर्गसंवर्धन चळवळीत सामील होऊन शिवकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन ही यावेळी आ. संजय केळकर यांनी बोलताना केले. आमदार केळकर यांनी कींजळोली खुर्द परिसरास पर्यटन स्थळ घोषित करावे यासाठी प्रयत्न करावेत याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीने निवेदन दिले.

रायगड जिल्ह्यातील ध्वजारोहणाची हॅट्रिक सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाली. जंजिरा किल्ल्यावर तिरंगा, पद्मदुर्ग किल्ल्यावर भगवा ध्वज व आता मुरारबाजी देशपांडे यांच्या स्मारकासमोर भगवा ध्वज उभारण्यात आला.

 

स्वराज्यासाठी रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे यांनी मोघल सैन्याशी लढताना जीवाची बाजी लावून प्राणाची आहुती दिली. त्यानंतर त्यांची समाधी कींजळोली खुर्द येथे बांधण्यात आली. 2018 साली ही समाधी दुरावस्थेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या निदर्शनास आली. त्यानंतर श्रमिक गोजमगुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीने या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला.

समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम करत असताना मुराबाजी देशपांडे यांचा अस्थिकलश आढळून आला. हा अस्थिकलश शिवभक्तांना दर्शनासाठी कार्यक्रमादरम्यान ठेवण्यात आला होता.