प्रभाग रचनेत पुन्हा फेरबदल
ठाणे – ठाणे महापालिका प्रभागरचनेवरील हरकतींनंतर मुंब्रा कौसा येथील तीन नगरसेवक कमी करून दिव्यात दोन आणि वागळे परिसरात एका नगरसेवकाची वाढ होणार असल्याची अतिशय गोपनीय माहिती ठाणेवैभवला मिळाली असून त्यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी – शिवसेनेत संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकीकरिता १ फेब्रुवारी रोजी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. २६फेब्रुवारी रोजी १९६४ नागरिकांच्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली होती. त्याचा अंतिम मसुदा २ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याची गोपनीय माहिती ठाणेवैभवच्या हाती लागली आहे.
दिवा येथे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेत चारचा एक आणि तीनचा एक असे दोन प्रभाग करण्यात आले होते. त्यामध्ये बदल करून दिवा येथे तीनचे तीन प्रभाग तयार करण्यात आले आहेत. मुंब्रा आणि कौसा येथील एक पॅनल कमी करून त्यामधील दोन जागा दिवा येथे वाढविण्यात आल्या आहेत तर वागळेमधील एक तीनचा प्रभाग एक जागा वाढवून चारचा केला असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले आहे. त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचा मोठा फेरबदल करण्यात आला नसल्याचे समजते.
कळवा – मुंब्रा या दोन प्रभाग समिती क्षेत्रात नगरसेवकांची संख्या वाढवून दिवा येथील जागा कमी करण्यात आल्या होत्या. त्यावर सर्वाधिक हरकती घेण्यात आल्या होत्या. शिवसेनेने देखील हरकत घेऊन वकिलांची फौज उभी केली होती. त्यांची हरकत ग्राहय धरण्यात आली असल्याचे समजते. मुंब्रा कौसा भागातील तीन जागा कमी झाल्याने त्याविरुद्ध राष्ट्रवादी देखील आक्रमक पवित्रा घेण्याची श्यक्यता आहे. २ मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष ठाणेकरांना पाहण्यास मिळेल असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.