विकेंद्रीकरणामुळे कचरा हस्तांतरण केंद्रावरील ताण कमी होणार!

वागळे इस्टेट परिसर घेणार मोकळा श्वास

* प्रभागनिहाय यांत्रिकी पद्धतीने खतनिर्मिती प्रकल्प
* क्षेपणभूमिसाठी भिवंडीतील जागेचा मिळाला ताबा

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेस क्षेपणभूमी तयार करण्यासाठी मौजे आतकोली येथे जागा उपलब्ध करून दिल्यामुळे ठाण्यातील कचरा समस्येवर तोडगा निघाला आहे. त्यामुळे वागळे इस्टेट येथील सी पी टॅंक या कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा साठून होणाऱ्या त्रासापासून परिसरातील नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.

राज्य शासनाने ठाणे महापालिकेस मौजे आतकोली येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा हस्तांतरित केली आहे. या जागेचा ताबा ठाणे महापालिकेला प्राप्त झाला असून त्याची हद्द निश्चिती पूर्ण झाली आहे. या जागेवर घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकात्मिक प्रकल्प उभारण्यात येत आहे. येथे कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे सी पी टॅंकवरील कचऱ्याचा भार कमी होईल आणि तेथे केवळ शहरातील कचऱ्याचे हस्तांतरण होईल, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

विकेंद्रित पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, कौसा, उथळसर येथे यांत्रिकी पद्धतीने खतनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले जात आहेत. तसेच, गायमुख येथे महापालिकेच्या जकात नाक्याच्या जागेतही यांत्रिकी पद्धतीने खतनिर्मिती प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याचा भार कोणत्याही एका जागेवर न येता घनकचऱ्याचे सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करणे शक्य होणार असल्याची ग्वाही आयुक्त राव यांनी दिली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दिवा येथील क्षेपणभूमीचा वापर करण्यात येत होता. या क्षेपणभूमीची क्षमता जानेवारी २०२३मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर, डायघर येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्व प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले. मात्र त्या प्रकल्पात काही तांत्रिक बदल करावे लागल्याने हा प्रकल्प तुर्तास बंद आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, भांडार्ली येथे सुरू करण्यात आलेल्या क्षेपणभूमीची क्षमताही मर्यादित आहे. त्यामुळे, वागळे इस्टेटमधील सी पी टॅंक येथील हस्तांतरण केंद्रात कचऱ्याची आवक वाढली. हा पर्याय हाताशी असल्याने ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याच्या हाताळणीची व्यवस्था उपलब्ध आहे. अन्यथा, महापालिका क्षेत्रात कचऱ्याची मोठी समस्या उद्भवू शकते.

ठाणे महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी नवीन जागेची निकड निर्माण झाल्याने राज्य शासनाकडे जागेची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून मौजे आतकोली येथील जागा घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध झाली आहे. या जागेवर कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होऊ लागल्याने ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या दरम्यानच्या काळात, सी पी टॅंक परिसरातील नागरिकांना कचरा साठून होणाऱ्या त्रासापासून दिलासा देण्यासाठी २० ऑगस्टपासून येथे केवळ कचरा हस्तांतरण केंद्र सुरू ठेवावे, कचरा साठवू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर, परिसरातील स्वच्छता राखणे, घंटा गाड्यांची ये-जा करताना कोणालाही त्रास होणार नाही, वाहतूककोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नागरिकांची गैससोय होऊ नये, असे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.