सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विजया पालव यांच्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे : महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विजया पालव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. दिवा येथे आपल्या राहत असलेल्या इमारतीच्या बिल्डर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जीवघेणा हल्ला केला असून बिल्डर मनमानी आणि गुंडा गर्दी करत असल्याचा आरोप यावेळी विजया पालव यांनी केला आहे. वारंवार बिल्डरच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या कारणावरून बिल्डर आणि त्याच्या कुटुंबीयांनी ही मारहाण केली असल्याचे विजया पालव यांनी सांगितले. या प्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून निष्पक्ष तपास केला जाणार असल्याचे मुंब्रा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या विजया पालव यांच्यावर काल २० मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास दिवा येथील आपल्या राहत्या इमारतीचे बिल्डर चेतन पाटील आणि त्याच्या कुटुंबीयांनी जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजया पालव यांनी आपल्या घरातील पाण्याच्या टाकीसोबत शौचालयासाठी जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी प्लंबरला बोलावले होते. मात्र बिल्डरने प्लंबरला इमारतीच्या खालीच हटकले आणि कोणाच्या घरी आले असल्याची विचारणा केली. प्लंबरने विजया पालव यांचे नाव घेतल्यानंतर बिल्डरने विजया पालव यांना इमारतीखाली बोलावून घेण्यास सांगितले. विजया पालव या इमारतीखाली आल्यानंतर बिल्डरने बाहेरील व्यावसायिकांना कुठलेही काम देऊ नये जे काही काम असेल ते माझीच माणसे काम करणार असा दम देण्यास सुरुवात केली. यावर विजया पालव यांनी बिल्डरच्या मनमानीला विरोध केल्यानंतर बिल्डर चेतन पाटील याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून विजया यांच्या साडीच्या पदराला धरून खेचत भिंतीवर आपटून १५ ते २० कानाखाली मारल्या. तसेच बिल्डर चेतन पाटील, त्याची आई, बायको, भाऊ आणि इतर सहकाऱ्यांनी विजया यांना जमिनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे.

या मारहाणीत विजया पालव यांना गंभीर दुखापत झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे. या घटनेनंतर विजया यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांचे बोलणे ऐकून घेत त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. उपचारानंतर विजया यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच विजया पाटील यांनी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आपल्याला न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

या आधी देखील विजया पालव यांनी बिल्डरच्या विरोधात आवाज उठवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. त्यावरून बिल्डर आणि त्यांच्यामध्ये अनेक वेळा वाद झाले होते. इमारतीतील नऊ जणांनी मिळून बिल्डरला पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहारात इमारतीतील पार्किंग, साफसफाई, पाण्याच्या पाईपलाईनची जोडणी (कनेक्शन) बदलले गेले, मेंटेनन्समध्ये करण्यात आलेली वाढ, नियमबाह्य दंड आकारणी, ड्रेनेज व्यवस्था व इतर कामाचा भुर्दंड रूम मालकांवर पडत असल्याचा मुद्दे व बाबी मांडण्यात आल्या होत्या. मात्र जाब विचारणा करणाऱ्यांना बिल्डरकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप विजया पालव यांनी यावेळी केला आहे. या संपूर्ण प्रकारादरम्यान बिल्डर ने पालव यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून आपल्या जीविताला धोका असल्याचे विजया पालव यांनी सांगितले आहे.

दिव्यातील सोनू पलेस या इमारतीमध्ये विजया पालव राहतात. त्या इमारतीचा मेंटनन्सचा भाग इमारतीचे अध्यक्ष आणि बिल्डर चेतन पाटील हे पाहतात. मात्र यावेळी इमारतीत बाहेरील व्यक्ती आल्यामुळे त्यांनी त्याला हटकले आणि इमारतीत येण्यास कोणी बोलावले अशी विचारणा करून त्या व्यक्तीला बोलावून घेण्यास सांगितले. त्यानंतर विजया पालव आणि चेतन पाटील या दोघांचे कुटुंब समोरासमोर आले आणि त्यांच्यात वादविवाद होऊन दोघांमध्ये हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत दोघांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात निष्पक्ष तपास केला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी सांगितले.

या घटनेमुळे भाजप उपाध्यक्ष आणि महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विजया पालव यांच्यावर दिवा येथे जीवघेणा हल्ला झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. महिलांवरील अत्याचारांनी कळस गाठलेल्या या निर्लज्ज महाविकासआघाडी सरकारच्या राज्यात स्त्री असणे हा अपराध झालाय.. मुख्यमंत्री घरात.. गुन्हेगार मोकाट.. अशी प्रतिक्रिया दिली आहे.