नवी मुंबई: सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासह सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरिता ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अखेरची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तारखेपर्यंतच ही सुवर्णसंधी उपलब्ध असल्याने, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर ‘या महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता २६ हजार सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेतील घरे ही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील असून नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी हे सर्व गृहप्रकल्प साकारण्यात आले आहेत.
अर्जदारांना आपले पसंतीचे सिडकोचे घर निवडताना मदत होण्यासाठी सिडकोतर्फे योजनेतील सदनिकांचे स्वरूप पाहता यावे याकरिता खारघर, सेक्टर-१४, खारघर (पूर्व) तळोजा, सेक्टर-३७ व खांदेश्वर, सेक्टर-२८ येथे अनुभूती केंद्रांची स्थापनाही करण्यात आली आहे. या केंद्राना भेट देऊन नागरिक आपले स्वप्नातले घर सत्यात कसे दिसेल याचा सुखद अनुभव घेऊ शकतात.
३१ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंतच ही सुवर्णसंधी उपलब्ध असल्याने अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज नोंदणी करून सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.