मान्सूनपूर्व कामांना डेडलाईन

मोबाईल बंद आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

ठाणे : पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्वांनी एकत्रितपणे आणि सतर्कतेने काम करण्याच्या सूचना देतानाच शहरातील नालेसफाई, स्वच्छता व रस्त्याच्या दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज संबंधित सर्व विभागांना दिले.

दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी २४ तास मोबाईल चालू ठेवावेत, कामाच्या वेळी मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाईचा ईशारा डॉ. शर्मा यांनी दिला आहे.

महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आज मान्सूनपूर्व तसेच मान्सून कालावधीत करावयाच्या कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उप आयुक्त दिनेश तायडे, उप आयुक्त अनघा कदम, उप आयुक्त शंकर पाटोळे, सर्व सहाय्यक आयुक्त तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरूस्तीची जी कामे सुरू आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच घनकचरा विभागाच्या वतीने प्रत्येक प्रभाग समितीनिहाय साफसफाई करण्यासोबत शहरातील संपूर्ण नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. शहरातील प्रभागसमितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणे, त्याचबरोबर धोकादायक इमारतींची यादी तयार करुन त्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत करुन सी 1 व सी 2 इमारती खाली करण्याचे आदेशही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबर्सवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ चेंबर्सची झाकणे बसविणे, चर बुजविणे व खड्डे बुजविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरात ज्या ठिकाणी पाणी पुरवठा, मलनि:सारण विभागाची कामे सुरू असतील त्या ठिकाणी सर्वतोपरी सुरक्षा घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या. विजेचा धक्का लागून, चेंबर्स उघडी राहिल्याने किंवा पावसाळ्यात वाहून जावून जीवित हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व संबंधित अधिका-यांना दिले. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहचावे यासाठी मनुष्यबळ व यंत्रणा विकेंद्रीत करुन ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळयात साथीच्या रोगांचा पादुर्भाव होवू नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे शहरातील आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू राहील याकडे विशेष काळजी घेण्यात यावी तसेच अग्निशमन विभागाने देखील याबाबत सतर्क राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. दरम्यान ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सून कालावधीत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून प्रभाग समितीनिहाय १ जून पासून आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.