थकबाकीदारांच्या मालमत्तांवर मनपाने आणली टाच
नवी मुंबई: अभय योजनेची सवलत देऊनही मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांविरोधात मनपाने दंड थोपटले असून शुक्रवारी डी मार्ट आणि हार्डीलिया कंपनी सिल करण्यात आली. या कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेत मालमत्ता कर हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र नवी मुंबई शहरात आजही काही मालमत्ताधारक मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी ठेवत आहेत, मात्र
वारंवार आवाहन तसेच अभय योजना लागू करून देखील काही मालमत्ता धारक कर भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मालमत्ता थकबाकी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपाने कंबर कसली असून मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. नोटीस देऊन देखील कराचा भरणा न केल्यामुळे जुई नगरमधील डी मार्ट मॉल आणि हार्डीलिया कंपनी आज सिल करण्यात आली. डी मार्टच्या मालकांनी मालमत्ताकरापोटी एक कोटी ६० लाख तर हर्डीलीया कंपनीची ११ कोटी थकबाकी आहे. यावेळी डी मार्टमध्ये आलेल्या ग्राहकांना बाहेर काढून ही कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे बड्या थकबाकी दारांचे धाबे दणाणले आहेत.