जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका, ‘दे धक्का २’ धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘थांबायच नाय गड्या, थांबायचं नाय’ हे वाक्य ऐकलं तरी डोळ्यासमोर ‘दे धक्का’ हा चित्रपट उभा राहतो. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाच्या जोडीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. यातील जाधव कुटुंबीय आणि त्यांचं आयुष्यातील धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. ‘दे धक्का’ या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतचं या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा जाधव कुटुंबियांचा धमाल अंदाज पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचे कथानक हे पहिल्या भागापेक्षा वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘दे धक्का २’ चे कथानक हे लंडनमध्ये घडणार आहे. यात राणीच्या देशात मराठमोळ्या जाधव कुटुंबियांची मजा पाहायला मिळणार आहे. यात शिवाजी साटम हे ‘काय झाडी, काय हॉटेल, ओक्के मधी समद’, अशा डायलॉग बोलताना दिसत आहे. त्यानंतर यात मराठी माणूस म्हणून हिणवणाऱ्या गोऱ्या माणसांना जाधव फॅमिली दरडावून एक वाक्य ऐकवताना दिसते. ‘नेवर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ मराठी माणूस’ म्हणजे मराठी माणसाला कधी कमी लेखू नका, असे बोलताना दिसत आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटात मराठी संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात केवळ मनोरंजन नव्हे तर जाधव कुटुंबियांवर नवे संकट कोसळणार असल्याचे दिसत आहे. या संकटातून जाधव कुटुंब कसे बाहेर पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशेष म्हणजे दे धक्काच्या पहिल्या भागात धनाजीने आणलेली टमटम लक्षवेधी ठरली होती. पण आता हे कुटुंबीय अशाच गाडीतून फिरत असल्याचे दिसत आहे. यात चित्रपटामधील पात्र मकरंद जाधव, सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसना पाहायला मिळत आहे.

सध्या हा ट्रेलर चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. येत्या ५ ऑगस्टला ‘दे धक्का २’ चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हापासून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आता चित्रपटाच्या नव्या भागामध्ये काय पाहायला मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.