मुंबई: विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दुसरा पेन ड्राइव्ह सादर करत महाविकास आघाडी सरकारला दुसरा हादरा दिला आहे. मंत्री नवाब मलिकांवर निशाणा साधत दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्ती केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.
वक्फ बोर्डात कसे पैसे कमवायचे याबाबतचा संवाद असलेला पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. वक्फ बोर्डाचे डॉ. मुद्दशीर लांबे आणि अर्शद खानशी संवाद झाला. या संवादात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अल्पसंख्याक विभागाशी लोकांचा दाऊदशी संबंध आला तरच त्यांना काम द्यायचं असं सरकारचा काही आहे का?, पोलिसांच्या बदल्या रॅकेट, महाकत्तलखानानंतर आज दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. एक मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे डॉ. मुद्दशीर लांबे. डॉ लांबे यांना अल्पसंख्याक विभागाने वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं आहे. ३१ डिसेंबर २०२० मध्ये लांबे यांच्याविरोधात एका ३३ वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत लग्नाच्या आमीष दाखवून बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. या महिलेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला तरीही लांबे यांच्यावर कारवाई केली नाही. २८ जानेवारी २०२२ ला लांबे यांनी महिलेच्या पतीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असं त्यांनी सांगितले.
या संवादात डॉ. लांबे म्हणतात की, माझे सासरे दाऊदचे राइट हँड होते, माझं लग्न हसीना आपा, इक्बाल कासकर पत्नी यांच्या मध्यस्थीने केले होते. त्यामुळे जरा काही झाले तर वरपर्यंत प्रकरण पोहचते. माझे सासरे संपूर्ण कोकण सांभाळायचे. मुंबईत माझे काका होते. मी मदनपुरात होतो. माझ्या घरात काही झालं तर थेट भाईपर्यंत वाद पोहचतो. आपल्याकडे पाहिजे तेवढा पैसा आहे. वक्फचं काम करा. जे काही होईल त्यात तुझे अर्धे आणि माझे अर्धे असा उल्लेख आहे. ज्या फोनवरून अर्शद खानसोबत संवाद झाला ते मी सभागृहात दिलं आहे. अर्शद खान हा ठाण्याच्या जेलमध्ये आहे. त्याचा मोबाईल पोलिसांकडे आहे, तो तत्काळ ताब्यात घ्यावा. चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्ती केलीत का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात विचारला.
दरम्यान, अर्थसंकल्पावर बोलत असताना एकीकडे ४ गोष्टी सरकार कमी करेल, एकीकडे वाढवेल, विकास कमी जास्त होईल. ते चालण्यासारखं आहे. परंतु दाऊदसोबत ज्यांचे संबंध आहेत अशा लोकांना महाराष्ट्र सरकार पाठिशी घालत असेल तर या राज्याचे कुणीच भलं करू शकत नाही. त्यामुळे आता तरी सरकारने जागे व्हावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.