मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महोत्सवाचे उद्घाटन
अंबरनाथ : जगविख्यात कलाकारांचे मंत्रमुग्ध करणारे संगीत सादरीकरण, विविध प्रांतातील खाद्य संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या पदार्थांचे स्टॉल्स, नामवंत कलावंतांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, लाईव्ह पेंटींग, पोट्रेट पेंटिंग, शिल्पकला अशा नानाविविध गोष्टींचा समावेश असलेल्या अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये अभिजात कलांचे दर्शन नागरिकांना घडणार आहे.
गुरूवार १६ ते १९ रविवार मार्च या कालावधीत शिवमंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ मार्चला होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंदिरात महाआरती केली जाणार आहे.
फेस्टिव्हलमध्ये एकाहून एक सरस अशा कार्यक्रमांची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवातील विविध कलादालनांमध्ये तब्बल ६० हून अधिक नामवंत चित्रकार, शिल्पकारांच्या उत्कृष्ट कलाकृती विशेष आकर्षण ठरणार आहे.
अंबरनाथ शहरात ९६३ वर्ष प्राचीन शिलाहार कालीन शिवमंदिराच्या परिसरात गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येते. गेली दोन वर्ष सर्वत्र करोनाच्या संकट काळात असल्याने हा महोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. फेस्टिव्हलमध्ये काही कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती कलादालनात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. हे कला प्रदर्शन महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य असून विविध केंद्रांवर त्या उपलब्ध आहे.
शिल्पकला प्रकारात राष्ट्रीय पुरस्कार विजेते सचिन चौधरी आणि रतन शहा हे आपल्या शिल्पाकृती सादर करणार आहे. तर यांच्याबरोबर प्रभाकर सिंग, आतिष पालवणकर, सिद्धी बेलवणकर, मनीष शिंदे हे कलाकार आपल्या कलाकृती प्रदर्शनात सादर करणार आहे. या कलाकृतींतून नागरिकांना पारंपरिक शिल्पकलेबरोबरच मॉडर्न आर्ट प्रकाराचीही अनुभूती घेता येणार आहे. क्रिएटिव्ह पेंटिंग प्रकारात पोट्रेट, अँबस्ट्रॅक्ट, वॉटर कलर, लँडस्केप यांसारख्या विविध चित्रांचे सादरीकरण केले जाणार आहे. या चित्र प्रकारात अनिल नाईक, विजयराज बोधनकार, किशोर नादावडेकर या ज्येष्ठ कलावंतांसह शैलेश मेश्राम, राकेश सूर्यवंशी, नानासाहेब येवले, निलेश भारती, राहुल महात्रे, प्रवीण कारंडे, लक्ष्मण चव्हाण, अजय मेश्राम, गायत्री खांडगे, अतिश पालवणकर, पंकज बावडेकर, सूरज कांबळे, विश्वनाथ साबळे, गणपत बडके, आशुतोश आपटे, अजिंक्य पाटील, स्वाती साबळे, अजित चौधरी, अभिषेक आचार्य, विनायक धामपूरकर, कैलाश लांडगे, सचिन सावंत, हेमंत मगार्डे, अशोक हिंगे, विवेक पहाडन, अनिकेत देवगिरीकर, स्नेहाल तांबूळवाडीकर, मंजू फटानी, मनोहर राठोड, संदीप शिंदे, सुधान्वी धर्णे, उदय देसाई, मानसी सागर, नागेश घोडके, देविदास अगासे, सायली वाघमारे, रिया चांदवानी, बोस्की आशीष कुबादिया, आशिष ठाकूर, श्रीकांत जाधव हे सर्व कलाकार त्यांची कला सादर करणार आहे.
यंदाच्या महोत्सवामध्ये प्रतिकृतीविषयी अर्थातच फिगरेटीव्ह आर्ट नागरिकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये संतोष पेडणेकर, कैलास अन्याल, जितेंद्र गायकवाड, प्रदीप घाडगे, धीरज पाटील, चंद्रकांत बोराडे, अमित दहाने हे कलावंत फिगरेटीव्ह आर्ट प्रकारातील चित्र साकारणार आहे. या सर्व नामवंत कलावंतांबरोबरच पंकज तळेले हे धातूच्या विविध साहित्याचा उपयोग करत (मेटल मिक्स मीडिया) कलाकृती साकारणार असून या कलादालनात त्या पाहायला मिळणार आहे. तसेच सुभाष शेगावकर हे रिअलॅस्टिक तसेच गणेश पेन हे कलावंत कॅनव्हास पेंटिंग प्रकारातील छायाचित्रांचे सादरीकरण करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायकांची उपस्थिती
या कला महोत्सवात राकेश चौरसिया, पंकज उधास, अमित त्रिवेदी, अनुराधा पौडवाल, मोहिम चौहान, मैथली ठाकुर आणि शंकर महादेवन हे सात लोकप्रिय कलावंत त्यांच्या लोकप्रिय रचना सादर करणार आहेत. गुरूवार, १६ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता मुख्य रंगमंचावर पहिल्या सत्रात प्रख्यात बासरी वादक राकेश चौरसिया आणि सहकाऱ्यांचे फ्युझन आणि दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ गायक पंकज उधास त्यांच्या सदाबहार गझल सादर करणार आहेत.
शुक्रवार, १७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता मुख्य रंगमंचावर नव्या पिढीचा लोकप्रिय गायक अमित त्रिवेदी आणि सहकाऱ्यांचे सादरीकरण होईल.
शनिवार, १८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता शिवमंदिराच्या प्रांगणातील दुसऱ्या रंगमंचावर लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या समधुर गीतांची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी ६ वाजता मुख्य रंगमंचावर लोकप्रिय गायक मोहित चौहान आणि सहकाऱ्यांचे सादरीकरण होईल.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी रविवारी, १९ मार्च रोजी सकाळी सात वाजता शिवमंदिराच्या प्रांगणातील दुसऱ्या रंगमंचावर अल्पावधीतच आपल्या सुरेल गायनाने लोकप्रियता युवा गायिका मैथली ठाकुर रसिकांपुढे तिची लोकप्रिय गाणी सादर करणार आहे तर संध्याकाळी मुख्य रंगमंचावर विख्यात गायक शंकर महादेवन यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
शिवमंदिराकडे येणाऱ्या मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, याशिवाय काही ठिकाणी आकर्षक स्वागत कमानी, वालधुनी नदी पात्र., पदपथ, भिंती यांवर सुंदर चित्र रेखाटण्यात आली आहेत.