चिंचपाडा रोडवरील अतिधोकादायक इमारत जमीनदोस्त, रस्त्याचा मार्ग मोकळा

कल्याण : कल्याण पूर्व, चिंचपाडा मार्गावरील, मलंगरोड ते उल्हासनगरपर्यंत जाणा-या 100 फुटी रस्त्याला बाधित असलेल्या माधव अपार्टमेंट या तळ अधिक तीन मजली अतिधोकादायक इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल पूर्ण केली. या रस्त्यामुळे पुणे लिंक रोडवरील वाहतूकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ड प्रभागाचे सहायक आयुक्त धनंजय थोरात यांनी ही कारवाई केली.

ही इमारत डीपी रोडमध्ये असल्याने अमृत योजनेच्या पाणीपुरवठ्याच्या वितरण वाहिन्या व जलनिस्सारण विभागाच्या जलवाहिन्यांचे काम थांबलेले होते. ही इमारत निष्कासीत केल्यामुळे अमृत योजनेचे काम पूर्ण करणे शक्य होणार आहे. या इमारतीमुळे सुमारे तीन वर्षापासून रखडलेल्या मल: निसारण विभागाच्या अमृत योजनेतील रायझिंग मेनचे काम पूर्ण होण्यास होणे शक्य होणार आहे.

ही इमारत सुमारे 28 वर्षे जुनी असून रहिवासमुक्त करण्यात आली होती. या इमारतीस धोकादायक नोटीस बजावण्यात आली होती. ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली.