वालधुनी नदीवरील धोकादायक पुलाची दुरुस्ती तातडीने होणार   

आमदार डॉ. किणीकर यांच्या एम.आय.डी.सी. अधिकाऱ्यांना सूचना

अंबरनाथ : अंबरनाथहून आनंदनगर एमआयडीसी आणि काकोळे गावाकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील वालधुनी नदीवरील धोकादायक पुलाची दुरुस्ती त्वरित करण्याच्या सूचना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

काटई नाक्यावरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या राज्य महामार्गावरील अंबरनाथ हद्दीतील आनंदनगर एम.आय.डी. सी.ला जोडणारा पूल धोकादायक झाल्याचे निदर्शनाला आले होते. या अनुषंगाने आज  बुधवारी आमदार डॉ. किणीकर यांनी  एम.आय.डी.सी. चे कार्यकारी अभियंता रमेश  पाटील यांच्यासह धोकादायक झालेल्या पुलाची पाहणी करून पुलाचे तात्पुरत्या स्वरूपात मजबुतीकरण करण्यात यावे आणि  संबंधित पूल नव्याने बांधण्याकरिता तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना एम.आय.डी.सी. च्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या धोकादायक पुलाची तातडीने पुनर्बांधणी करण्यात यावी याकरिता मंगळवारी उद्योग सुभाष देसाई,  ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार डॉ. किणीकर यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख  शिवाजी गायकवाड, संजय मिसाळ, एमआयडीसीचे उप अभियंता विजय शेलार तांत्रिक सहाय्यक प्रमोद शिरवले आदी उपस्थित होते.

महामार्गावरील रस्त्यांवरील तीव्र स्वरूपातील चढ-उतार कमी करण्यात आले आहेत, संबंधित पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यात आलं आहे, संबंधित पूल अरुंद असून लगेच  तीव्र उतारानंतर लगेच चढण  असल्याने  वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडतात, सध्या वालधुनी नदी स्वच्छतेचे काम सुरु असल्याने त्यावेळी नदीवरील पूल धोकादायक असल्याचे आढळून आले होते.